स्नेहा मोरे /मुंबईगेल्या काही वर्षांत वाढत जाणाऱ्या डॉक्टरांच्या ‘कन्सल्टेशन’ शुल्कामुळे सामान्यांच्या घरातील अर्थकारण बिघडले आहे. त्यात औषधांच्या चढ्या भावामुळेही सामान्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. याला आळा घालण्यासाठी मुंबईतील दोन डॉक्टर भावांनी अवघ्या एक रुपयांत सल्ला देणारे ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्याचे ठरविले आहे.मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांवर सुरू होणारे आगळ््या-वेगळ््या प्रकारचे पहिलेच क्लिनिक असून, येथील ‘कन्सल्टेशन फी’ केवळ एक रुपया असणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे क्लिनिक सुरू होणार आहे.मुंबईस्थित डॉ. राहुल घुले आणि डॉ.अमोल घुले यांची ही संकल्पना आहे. या दोन सख्ख्या भावांनी पुढाकार घेऊन, मध्य रेल्वे व्यवस्थापनाच्या मदतीने हा प्रकल्प प्रत्यक्ष साकारला आहे. या माध्यमातून एका स्थानकावर ४ ते ५ डॉक्टरांचा चमू असणार आहे. या क्लिनिकमध्ये एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्सचा सहभाग असेल, विविध शाखांचे जवळपास १०० तज्ज्ञ डॉक्टर्स या क्लिनिकमध्ये आहेत. या क्लिनिकमध्ये एक रुपया शुल्क घेत डॉक्टर्स रुग्णांना सल्ला देतील. शिवाय, रुग्णांना औषधेही २० टक्के सवलतीत पुरविण्यात येतील, तसेच वैद्यकीय चाचण्यांकरिता सद्यस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात स्वीकारण्यात येणाऱ्या दरांपेक्षा ४० टक्के सवलत रुग्णांना देण्यात येणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर तिकीट घराच्या बाजूला हे क्लिनिक असणार आहे.रात्रंदिवस ‘मोफत आपत्कालीन सेवा’दिवसागणिक रेल्वे अपघातांत वाढ होत आहे, तसेच बऱ्याचदा रेल्वे अपघातांतील जखमींना वेळेवर उपचारही मिळत नाहीत. यावर तोडगा म्हणून रेल्वे अपघातांतील जखमींसाठी या ‘वन रुपी क्लिनिक’ च्या माध्यमातून मोफत आपत्कालीन सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा रात्रंदिवस सुरू असणार आहे.माध्यमातून खेड्यांत सेवाराज्यात दुष्काळाने होरपळलेल्या भागांत गेली चार वर्षे याच पद्धतीने आम्ही उपक्रम राबवित होतो. गेल्या चार वर्षांत सोलापूर, बीड, पंढरपूर अशा अनेक गावा-खेड्यांतील ग्रामीण जनतेसाठी ही संकल्पना राबविली, या संकल्पनेचा लाभ अनेकांनी घेतला. याविषयी सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे डॉ.राहुल घुले यांनी सांगितले.आई हीच एकमेव प्रेरणागेल्या वर्षी माझ्या आई-बाबांचा रस्ते अपघात झाला, त्यात आई गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला जबर मार बसला. त्या वेळी उपचारांकरिता एका रात्रीत बीड, पुणे अशा वेगवेगळ््या ठिकाणी नेण्यात आले. दोन वेळा तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला, सहा महिने ती अतिदक्षता विभागात होती. त्यानंतर, तिला अर्धांगवायूचा झटका आला, त्यामुळे ती पूर्णपणे काहीच करू शकत नाही. आईच्या या अपघातानंतर सामान्यांसाठी आरोग्य सेवा सुलभ आणि सहज करावी, या दृष्टीने विचार सुरू होता. त्या वेळेस कोणत्याही प्रकारचे उपचार सामान्यांना परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावे, या विचाराने ३-४ वर्षे अभ्यास केला. या सर्व प्रकल्पामागे ‘आई’ ही एकमेव प्रेरणा आहे. - डॉ. राहुल घुले
स्थानकांवर लवकरच ‘वन रुपी क्लिनिक’
By admin | Published: May 01, 2017 7:01 AM