शिवाजी महाराजांचे पुतळे छत्राविना
By admin | Published: March 15, 2017 02:55 AM2017-03-15T02:55:30+5:302017-03-15T02:55:30+5:30
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अंधेरी (पूर्व) मरोळ येथील शिवाजी महाराजांचा पुतळा छत्राविना आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अंधेरी (पूर्व) मरोळ येथील शिवाजी महाराजांचा पुतळा छत्राविना आहे. येथील दोन्ही पुतळ्यांचे ऊन-पावसापासून रक्षण व्हावे, याकरिता पुतळ्यावर छत्र बसवण्यासाठीचा मुहूर्त सेना-भाजपा युती शासनाला अद्यापही सापडलेला नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी स्वबळाचे संकेत देताना विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याच्या परिसरात भाजपाने जोरदार सजावट व विद्युत रोषणाई केली होती. शिवसेनेतर्फे गेल्या १ मे रोजी सकाळी १० वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने या ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र या विषयाकडे अद्यापही कोणी लक्ष दिलेले नाही.
महत्त्वाचे म्हणजे वॉचडॉग फाउंडेशनने दोन्ही ठिकाणी छत्र बसवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र सरकारचे याकडे लक्ष नाही, असे संस्थेचे पदाधिकारी गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉइंटसाठी भांडणाऱ्या सेना-भाजपाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.