पूजा दामले, मुंबईपुरुषांच्या हातात सर्रास दिसणारी सिगारेट आता युवती आणि महिलांच्या हातातील ‘स्टेट्स सिम्बॉल’ बनू पाहत आहे. अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूएशन’ने जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात अमेरिकेनंतर भारताचा महिलांच्या धूम्रपानात दुसरा क्रमांक लागतो. भारतात १९८० ते २०१२ या कालावधीत धूम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या ५.३ दशलक्षावरून १२.७ दशलक्ष इतकी झाली आहे. जागतिकीकरणामुळे चांगल्या बदलांबरोबरच वाईट बदलही समाजात रुजू पाहत आहेत. त्यापुढे जाऊन वाईट बदलांनाही समाजमान्यता मिळत असल्याने ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही वर्षांपर्यंत महिला खुलेआम धूम्रपान करताना फारशा नजरेस पडत नव्हत्या. पण आता सहज रस्त्यांवर, पबमध्ये, रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये महिला सिगारेट ओढताना दिसतात. मुली-महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत ३५ टक्के इतके असल्याची माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली. सध्या संवादासाठी मोबाइल्स, आॅनलाइन चॅट असे तंत्रज्ञान सहज उपलब्ध आहे. तथापि, भावना व्यक्त कराव्यात, अशी विश्वासातील माणसे कमी होत आहेत. त्यामुळेही अनेक मुली व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे रोखण्यासाठी बंदी हा उपाय असू शकत नाही. त्यापेक्षा धूम्रपानासाठी ‘स्मोकिंग’ झोन करायला हवेत. केंद्राने पुढाकार घेत राज्यांमध्ये महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्र स्थापण्याची आवश्यकता आहे. अनेकदा पालकांकडे पाहून मुले व्यसनांच्या आहारी जातात, त्यामुळे पालकांनी संयम ठेवून विचाराने वागले पाहिजे, असेही वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.महिलांमध्ये विडी ओढण्याचे प्रमाण अधिक शहरी आणि ग्रामीण भागाची तुलना केल्यास विडी ओढणाऱ्या महिलांचे प्रमाण राज्यासह देशात अधिक आहे. २०१० च्या अहवालानुसार, तंबाखू खाण्याचे प्रमाण हे १८ टक्के तर धूम्रपानाचे २.९ टक्के आहे. यापैकी १.९ टक्के महिला या विडी, तर ०.८ टक्के महिला सिगारेट ओढतात. अनेकदा तंबाखू आणि स्तनाच्या कर्करोगाचा घनिष्ठ संबंध आढळला आहे. राज्याचा विचार केल्यास तंबाखूचे व्यसन लागण्याचे मुलांचे वय सर्वसाधारण १७, तर मुलींचे वय १६ इतके आहे. ग्रामीण परिसरात मशेरीपासून व्यसनाची सुरुवात होते. म्हणूनच मध्य प्रदेशच्या सुनीता तोमार ही पुढे आल्यामुळे ‘महिलांसाठी’ कॅम्पेन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट दिसून आले होते.- डॉ. पंकज चतुर्वेदी, प्राध्यापक, हेड अॅण्ड नेक विभाग, टाटा रुग्णालय‘इच्छा’ महत्त्वाची भूमिका बजावते व्यसन सोडण्याची इच्छा असणे महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीवर उपचार केले, त्याचे समुपदेशन केले तरी त्याची इच्छा नसल्यास व्यसन सुटत नाही. मी पाच मुलींवर गेल्या वर्षात उपचार केले आहेत. त्यापैकी चार जणींचे धूम्रपानाचे व्यसन सुटले आहे. पण एका मुलीचे व्यसन अजूनही सुटलेले नाही. काही वेळा धूम्रपान करायचे नाही असे ठरवल्यावर काही व्यक्ती धूम्रपान न करता, सामान्यपणे जगू शकतात. पण काहींना असे करणे शक्य होत नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागते. सिगारेट ओढल्याशिवाय करमत नाही. अशा वेळी कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातही इच्छा निर्माण होण्यास मदत होते. यानंतर व्यसन सोडणे अधिक सोपे असते. - डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ गर्भधारणेवर होतो परिणामधूम्रपानाचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होत असतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीबरोबरच आजूबाजूच्या व्यक्तींच्या आरोग्यालाही धोका असतो. महिला धूम्रपान करत असल्यास त्यांच्या बाळांवरही परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या बाळांचे वजन जन्मावेळी कमी असते. काही वेळा जन्मानंतर त्या बाळाचा मृत्यू होतो. धूम्रपानाचा परिणाम गर्भधारणेवर होतो. याचा मुलींनी, महिलांनी गांभीर्याने विचार करायला हवा. हुक्का पार्लरमुळे अनेक मुलींना सिगारेटचे व्यसन लागते. हे बंद झाल्यास अनेकांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवता येईल. शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. त्यामुळे ते व्यसन करणार नाहीत.- डॉ. विनय हजारे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी निकोटिनमुळे सिगारेटचे व्यसन लागल्यास मनात इच्छा असूनही मोह आवरता येत नाही. अनेकांना सिगारेट बंद करणे शक्य नसते. अशांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीचा (एनआरटी) वापर केला जातो. या थेरपीमध्ये गोळ्या अथवा पॅचचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे समुपदेशन आणि उपचार १२ आठवडे चालतात. स्वत:ला सिगारेट सोडायची असते त्यांचे उपचार १२ आठवड्यांत पूर्ण होतात. काही जणांना अधिक काळ उपचार घ्यावे लागतात. लोकसहभाग हवाअत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धूम्रपानाला समाजमान्यता मिळते आहे. काही वर्षांपूर्वी मुलगी सिगारेट ओढताना दिसली तर लोकांच्या भुवया उंचावयाच्या. पण आता मुलगी धूम्रपान करताना दिसल्यास गंभीरपणे दखल घेतली जात नाही. सहज पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे मुलींच्या धूम्रपानाला मान्यता मिळत आहे. भविष्याच्या दृष्टीने हे अत्यंत विदारक चित्र आहे. वेळीच याला आळा घालण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. व्यसन न करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन धूम्रपानाला विरोध केला पाहिजे. पालकांनी हे लक्षात घ्यावे...मुली-महिला शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र मिळत आहे. हे स्वातंत्र्य उपभोगताना त्यांना नवीन गोष्टी करून पाहण्याची क्रेझ असते. धूम्रपान करणे वाईट आहे, हे मुलींना माहीत असले तरीही त्या करतात. कारण, अनेकदा घरात त्यांना ‘मुलगी आहे’ म्हणून बंधनात ठेवले जाते. अनेक गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात. हे चुकीचे आहे. त्यापेक्षा पालकांनी मुलींबरोबर संवाद वाढवला पाहिजे.
सिगारेट महिलांसाठीही ‘स्टेटस सिम्बॉल’
By admin | Published: January 07, 2016 1:53 AM