परमबीर यांच्याविरोधातील एक खटला स्थगित करा, सीबीआयची सत्र न्यायालयाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:21 AM2023-06-01T08:21:29+5:302023-06-01T08:22:12+5:30
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध दाखल असलेला खंडणीच्या आणखी एका खटल्याची सुनावणी पुढील तपासाच्या कारणास्तव स्थगित करावी, अशी मागणी सीबीआयने अर्जाद्वारे सत्र न्यायालयात केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सिंह यांच्याविरुद्ध खंडणी आणि तत्सम गुन्ह्यांच्या आरोपाखाली पाच गुन्हे दाखल केले. इतकेच नव्हे तर डिसेंबर २०२१ मध्ये सिंह यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. आपल्याविरोधातील गुन्हे एकत्रित करून त्यांचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही २४ मार्च २०२० रोजी सिंह यांच्याविरुद्ध प्रलंबित पाच गुन्ह्यांची पुढील कार्यवाही व तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता.
तीन प्रकरणांत आरोपपत्र नाही
परमबीर सिंह यांच्याविरोधातील स्थगित असलेल्या खटल्यात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असले तरी त्यात सिंह यांना आरोपी दाखवण्यात आलेले नाही. सीबीआयने सिंह यांच्याविरोधात दाखल पाचपैकी तीन प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेले नाही. मे महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सिंह यांचे निलंबन मागे घेतले होते.