मुंबई : सोशल मीडियावर एखादी गोष्ट येणे आणि ती अवघ्या काही वेळात ‘व्हायरल’ होणे नवे नाही. सध्या या व्हायरलमध्ये नवे अॅप ट्रेंडिंगमध्ये आहे. पोकेमॉन गो, ब्ल्यू व्हेलनंतर आता सौदी अरेबियाहून दाखल झालेल्या ‘साराहाह’ अॅपने सर्वांनाच वेड लावले आहे. या अॅपच्या माध्यमातून येणाºया मेसेजेसद्वारे एखाद्याला नैराश्य येऊ शकते, त्यातून चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत व्यक्त करत मानसोपचारतज्ज्ञांनी वेळीच धोका ओळखून यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.या अॅपच्या माध्यमातून युझर्स त्यांच्या प्रोफाइलमधील व्यक्तींना मेसेज पाठवू शकतात. या अॅपमधून मेसेज प्राप्त करणाºया व्यक्तीला हे कळत नाही की मेसेज कुणी पाठवला आहे. सध्या या अॅपमध्ये मेसेजला रिप्लाय करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना मेसेज पाठवू शकता. मात्र, त्यांना तुमचे नाव कळत नाही. म्हणजे ज्या लोकांशी तुम्ही समोरासमोर काही बोलू शकणार नाहीत त्यांच्याशी या अॅपच्या माध्यमातून बोलू शकणार आहात. पण त्यांना तुम्ही कोण आहात हे कळत नाही. या अॅपमुळे बºयाचदा युझर्सला नकारात्मक मेसेज पाठविले जातात. शिवाय, बºयाचदा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावरून किंवा दिसण्यावरून वक्तव्य केले जाते. त्यामुळे न्यूनगंड येऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो, असे केईएम रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आत्मविश्वास कमी झाल्याने स्पर्धात्मक युगापासून माघार घेऊन मानसिक ताणतणावाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बºयाचदा या माध्यमातून मेसेज करणाºयाची ओळख गुप्त राहत असल्याने तरुणी- महिलांना चुकीचे मेसेजेस मिळाल्याचीही उदाहरणे असल्याचेही डॉ. मुंदडा यांनी सांगितले. लाइक्स, कमेंट्स मिळविण्यासाठी या अॅपचा आधार घेतला जातो. त्यामुळे आपापसातील नकारात्मक भावना वाढीस लागताना दिसून येते, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. या अॅपमुळे सायबर बुलिंगचे प्रमाण वाढू शकते. शिवाय, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने या अॅपचा वापरही चुकीचा आहे. याउलट, आपल्या कुटुंबीयांसह, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसह समोरासमोर संवाद साधला पाहिजे, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
‘साराहाह’ अॅपपासून दूर राहा!, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला, धोका ओळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 7:08 AM