इथे राहून तर दाखवा! डम्पिंग ग्राउंडसह जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाने जीव जातोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 02:27 PM2023-06-15T14:27:55+5:302023-06-15T14:28:41+5:30
मृत्युदर ९.८ टक्के असल्याची माहिती
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी, देवनार, मानखुर्द आणि चेंबूरमधील वायुप्रदूषणाने कहर केला असून, गोवंडीमधील रहिवासी तर डम्पिंग व जैववैद्यकीय कचरा प्रकल्पामुळे मेटाकुटीस आले आहेत. दुर्दैव म्हणजे इतर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी प्रदूषणाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी प्रदूषणावर एक शब्दही काढत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डम्पिंगवरील प्रदूषण कमी व्हावे म्हणून यंत्रणा काही करत नाही आणि जैववैद्यकीय कचरा प्रकल्प इतरत्र हलविण्याबाबत वेगाने कार्यवाही होत नाही, अशी खंत व्यक्त करत रहिवाशांनी आता आम्ही जिथे राहतो; तिथे तुम्ही राहून दाखवा, असे आव्हानच दिले आहे.
कुठे होते प्रदूषण?- देवनार, इंडियन ऑइल नगर, टाटानगर कॉलनी, पीएमजीपी कॉलनी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, रफीकनगरासह जवळच्या परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे.
परवानगी कधी मिळणार?- जैववैद्यकीय कचऱ्याचा प्रकल्प जून २०२३ पर्यंत खालापूर येथे हलविणे अपेक्षित होते. मात्र, तिथे प्रकल्पासाठी काही परवानग्या मिळणे शिल्लक असल्याने तिकडेही त्याचे काम सुरू झालेले नाही.
पावसाळ्यात काय होणार?- हवेतील प्रदूषकांची पातळी पावसाळ्यात सर्वांत कमी व हिवाळ्यात सर्वाधिक असते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर मिसळल्याने व समुद्रावरून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे प्रदूषणाचा निचरा होतो. मात्र, गोवंडीकरांना वर्षाच्या बारा महिने अडचणींचा सामना करावा लागतो.
प्रदूषण जास्त- कार्बन मोनॉक्साइडच्या २४ तासांची सरासरी पातळी ०.९ - २.३ पीपीएम यादरम्यान असून, जानेवारी ते एप्रिल २०२२ या महिन्यांत निर्धारित मानकापेक्षा जास्त आहे. मृत्युदर ९.८ टक्के आहे, असे टाटा समाज विज्ञान संस्थेच्या संशोधनातून समोर आले आहे. घरोघरी एअर फ्युरी फायर बसविले जात आहेत. त्याची किंमत अधिक असल्याने ही उपकरणे परवडत नाहीत.
लोकप्रतिनिधी काय करतात?- गोवंडीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी इतर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. मात्र येथील लोकप्रतिनिधी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दुर्दैव म्हणजे प्रदूषण मंडळ आणि महापालिका गोवंडीमधील प्रदूषणावरून टोलवाटोलवी करत आहेत. जैववैद्यकीय कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत कोणताही विलंब पालिकेकडून झालेला नाही, असे पालिका म्हणते. महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणाच्या झालेल्या नोंदीत प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले आहे.
गेल्या १३ वर्षांपासून गोवंडीमधील डम्पिंग ग्राउंड आणि जैववैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पामुळे होत असलेले प्रदूषण रहिवाशांच्या जिवावर उठले असून, गेल्या १० वर्षांत महापालिकेच्या एम-पूर्व विभागात १ हजार ८७७ रहिवाशांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. -शेख फय्याज आलम, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी