ठळक मुद्देशेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचे ट्विट करत नव्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.१५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील असे म्हणत ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई - आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिला. मात्र, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी, आरेतील कारशेडच्या स्थगितीचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यावर, आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी या निर्णयाचं स्वागत केलं असून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचं आदित्य यांनी म्हटलं असलं तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचे ट्विट करत नव्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील असे म्हणत ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या निर्णयामुळे मुंबईतील सर्वच नागरिक आनंदी झाले आहेत, असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच, विकासकामे सुरु राहतीलच, पण पर्यावरणाला होणार हानी चालणार नाही, त्यामुळे आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं आदित्य यांनी म्हटलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरूवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवनाला रोषणाई करण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भवनासमोर नागरिकांनी पोस्टर झळकावून उद्धव ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली होती. मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती.