मुंबई - पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर या हजारोंच्या उपस्थितीत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात मुस्लीम बांधवही उत्स्फुर्तपणे सहभागी होते. मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चातील उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, देशातील मुस्लीम हा आमचाच असल्याचंही ठणकावून सांगितलं. तसेच, देशातील मुस्लिमांनाही त्यांनी आवाहन केलंय.
भारतात परदेशातून मुल्ला मौलवी येतात, हे मला पोलीस खात्यातूनच समजलंय. हे जे काही घडतंय ते खूप काही मोठं घडविण्याचं षडयंत्र असल्याचं मला त्यांनी सांगितलंय, असे म्हणत यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले. तसेच, एनआरसीबद्दल जे हिंदू, दलित अन् आदिवासी आहेत, त्यांना पुरावे मागू नये, असेही ते म्हणाले. देशभरात ज्यांनी मोर्चे काढले त्यांना हे मोर्चातून दिलेलं उत्तर आहे. तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते जगातील कुठल्याही देशात मिळत नाही. सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे, जो माझा मराठी मुसलमान आहे, त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे. जे काही चाललंय ते त्यांनीही पुढे येऊन सांगितलं पाहिजे, असे आवाहनही राज यांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मोर्चा पार पडला. त्यानंतर आझाद मैदानावरील सभेला राज यांनी संबोधित केले. राज्यभरातून हजारो मनसैनिक या मोर्चासाठी आले होते. या मोर्चात मुस्लीम बांधवही उपस्थित होते. मनसेचा हा मोर्चा मुस्लीम बांधवांविरुद्ध नसून पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसकोरांविरोधात असल्याचे या मुस्लीम बांधवांनी सांगितलं. तर, राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात देशातील आणि महाराष्ट्रातील मुस्लीमांचा हा देश असल्याचं म्हटलं. अनेक मराठी मुसलमान आहेत तिथे दंगली होत नाहीत. पण, जिथे बाहेरून मुस्लीम येत आहेत, तिथेच गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे, असे राज यांनी म्हटले.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना ह्या देशातून हाकललंच पाहिजे. कारण, भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे म्हणत देशातील आणि मराठी मुस्लीम हा आमचाच आहे, असेही राज यांनी ठणकावून सांगितले.