टेस्ट ड्राइव्हची कार चोरणाऱ्याला अटक
By admin | Published: July 9, 2015 12:51 AM2015-07-09T00:51:10+5:302015-07-09T00:51:10+5:30
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मर्सिडीज कार चोरणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेली कार घेऊन तो फलटण येथे लपला होता.
नवी मुंबई : टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मर्सिडीज कार चोरणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेली कार घेऊन तो फलटण येथे लपला होता. अखेर यापूर्वी त्याने पुणे येथे केलेल्या गुन्ह्यातील पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.
प्रतीक भोसले (२२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कार खरेदीच्या बहाण्याने वाशी सेक्टर १९ येथील मर्सिडीज बेंझ कार शोरूममध्ये जाऊन त्याने कार चोरली होती. कार खरेदीची तयारी दाखवून त्याने टेस्ट ड्राइव्हसाठी कार नेली होती. यावेळी कारसोबत आलेली शोरूमची कर्मचारी श्वेता राऊत (२६) हिला नेरुळच्या रंगोली हॉटेलमध्ये बसवून तो कार घेऊन फरार झाला होता. याप्रकरणी ३४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या कार चोरीची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद रोमन यांनी जलदगतीने तपासकार्याला सुरुवात केलेली. तपासादरम्यान पुणे येथील मर्सिडीज बेंझ शोरूममध्ये असाच प्रकार झाल्याचे उघड झाले. तिथले व वाशीच्या शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही घटनांतील आरोपीच्या चालीत साम्य आढळल्याचे पोलीस निरीक्षक रोमन यांनी सांगितले. त्यानुसार पुण्याच्या घटनेतील आरोपीचे छायचित्र वाशीच्या शोरूममधील कामगारांना दाखवले. त्यांनी प्रतीक भोसले याला ओळखले. पुण्यातील प्रकरणात कारवाईनंतर तो जामिनावर मुक्त होता. पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने शिक्षण देखील अर्धवट सोडले आहे. पोलिसांनी पुण्यातील त्याच्या घरावर धडक दिली, त्यापूर्वीच त्याने ते घर सोडले होते. तो पुण्याकडे जात असल्याचे समजताच त्याला अटक केली.
----------------------
कारच्या शोधात पोलीस फलटणकडे जात असताना मार्गात एका ठिकाणी चहापान करण्यासाठी थांबले. याच ठिकाणापासून काही अंतरावरील गॅरेजमध्ये मर्सिडीज उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी गॅरेजमध्ये चौकशी केली असता प्रतीकनेच कार तिथे सोडल्याचे समजते. तो पुण्याकडे परत येत असताना टायर पंक्चर झाल्याने कार सोडून तो एसीटीने पळाला.
वाशीतील मर्सिडीज कारमध्ये गेल्यानंतर त्याने आजच कारची डिलिव्हरी पाहिजे असल्याचे सांगितले होते. त्याकरिता आजच १० लाख रुपये रोख, १० लाखांचे धनादेश व उर्वरित रक्कम नंतर देतो, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे शोरूमच्या कामगारांनी कार टेस्ट ड्राइव्हला देण्यापूर्वी त्याच्याकडून ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स घेतली नव्हती. त्यांच्या याच निष्काळजीपणामुळे शोरूममधील कार चोरीला गेली होती.