Join us  

वाहनांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू चोरायचे; लग्नाच्या हॉलबाहेरील गाड्यांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 5:57 PM

एक साथीदार पसार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

मुंबई :

लग्न मंडपाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडत त्यातून मौल्यवान तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू पळवून नेणाऱ्या दुकलीला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली, तर त्यांचा एक साथीदार पसार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरा चौहान (३९) आणि सरफुद्दीन शेख (५५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर विनोद पवार (३५) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. हे चोर मौल्यवान वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेल्या रस्त्यांवरील उभ्या वाहनांना लक्ष्य करायचे. तसेच विशेषतः विवाह हॉलच्या बाहेर सक्रिय असायचे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या खिडक्या फोडून त्याची मोडतोड करायचे. त्यांच्या विरोधात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि पालघरसह विविध भागांत गेल्या दीड वर्षांत ५०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील शेख याला  परिमंडळ ९मधून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाइल आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

 अद्याप त्यांना ११ प्रकरणे सोडविण्यात यश आले असून, जप्त केलेल्या दुचाकींपैकी एक रे रोड परिसरातून चोरीला गेली होती.  ही चोरी चौहान आणि पवार यांनी केल्याचेही अधिकाऱ्याने नमूद केले. शेख याला डीएननगर येथून, तर चौहानला कसारा येथून अटक करण्यात आली.  चौहानला अटक करताना त्याच्या साथीदारांनी पोलिस पथकावर रॉकेल आणि मिरची पावडर फेकली. चौहान हा अनेकदा त्याची मुले शिकत असलेल्या कसारा येथे जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून चौहानला पकडले. सध्या हे  दोन संशयित पोलिस कोठडीत आहेत.

टॅग्स :चोरीमुंबई