गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बांगुर नगर पोलिसांच्या हद्दीत एका फ्लॅटच्या बाहेरील दरवाजाचे ग्रील वाकवून आत शिरत जवळपास ३०.४५ लाखांची चोरी करण्यात आली. याप्रकरणी संशयित महिलेला स्थानिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सोनिया मिरचंदाणी (६९) या मालाड पश्चिमच्या एव्हरशाईन नगर परिसरात राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्या १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता स्थानिक परिसरात असलेल्या गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथून जवळपास ६.४५ च्या सुमारास परतल्या. तेव्हा त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या मालिनी कपूर यांनी त्यांना एका महिलेला पोलिसांनी पकडून नेल्याचे सांगितले.
सोनिया गडबडीने फ्लॅटवर गेल्या जिथे पोहोचल्यावर त्यांना फ्लॅटच्या बाहेरील दरवाज्याचे ग्रील वाकलेले दिसले. तसेच आतील पंखा आणि लाईट देखील सुरू होते. त्यामुळे त्यांनी बेडरूममध्ये जाऊन त्यांचे कपाट तपासले. मात्र कपाटात ठेवलेले त्यांचे सोन्याचे दागिने, रोकड गायब होती. तेव्हा त्यांनी याबाबत सोसायटीच्या सेक्रेटरींना कळवले. तेव्हा सोसायटीमध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका महिलेला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असे सेक्रेटरी सोनीया यांना म्हणाले.
त्यानुसार सोनियानी बांगुरनगर पोलिसात धाव घेतली. त्याठिकाणी शीतल उपाध्याय (३८) नावाच्या कुर्ल्यात राहणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांना दिसले. याच महिलेने त्यांच्या घरातून जवळपास ३०.४५ लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३०५,३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.