मुंबई : पॅरोल रजेवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा चोरी केल्याचा प्रकार डोंगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड़ झाला आहे. मेहराज उर्फ पेंढारी मुर्तुजा खान (२४) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध भायखळा आणि वडाळा पोलीस ठाण्यात ७ गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तक्रारदार वाड़ीबंदर पोलीस लाईन येथे पोहचताच, दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा करत पथकाने अधिक तपास सुरु केला आहे.
गुन्ह्याच्या तपासात रात्रपाळीवर कर्तव्यावर असलेले सपोनि घोरपडे ,पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दिनकर ,पोलीस शिपाई इम्रान मुल्ला, पोलीस शिपाई राजू पवार, पोलीस शिपाई विश्वास शेलार यांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्याच्या मदतीने अवघ्या तीन तासाच्या आत खानला घोडपदेव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा मित्र वसीम याच्या मदतीने गुन्हा केल्याबाबत माहिती दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकल व चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
खान हा घोड़पदेव येथील रहिवासी असून तो गॅस डिलिव्हरी करण्याचे काम करतो. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, चोरी, यासह विविध कलमान्वये ७ गुन्हे नोंद आहेत. पॅरोल रजेवर बाहेर आला असताना त्याने हा गुन्हा केला आहे. याप्रकरणी त्याच्याकड़े अधिक तपास सुरु आहे.