मुंबई : मालकाचा विश्वास जिंकून नंतर तो तोडण्याचा प्रकार मालाडमध्ये सोमवारी उघडकीस आला आहे. एक मोलकरीण मालकाच्या घरातील पैसे चोरत होती. मात्र, या मोलकरणीला हुशार मालकिणीने रंगेहाथ पकडले.अन्नपूर्णा खडसे (३६) असे अटक करण्यात आलेल्या या मोलकरणीचे नाव आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गाला यांच्या कपाटातील पैसे चोरीला जात होते. मात्र, कुटुंबातल्याच एखाद्या व्यक्तीचे हे काम असल्याचे वाटल्यामुळे गाला यांची आपापसात भांडणे होऊ लागली. तथापि, मोलकरणीवर कोणीच संशय घेतला नाही. मात्र, हा प्रकार नित्याने घडू लागल्याने गाला यांच्या पत्नीचा संशय बळावला आणि त्यांनी कपाटात नोटांच्या शेजारीच त्यांचा मोबाइल कॅमेरा लपवला. मात्र पुन्हा चोरी झाली. मात्र, मोलकरणीचा चेहरा त्यात रेकॉर्ड झाला नाही. तेव्हा पुन्हा त्यांनी मोबाइल नीट रेकॉर्डिंग होईल, याची काळजी घेत लपवला. कॅमेऱ्यामध्ये पैसे चोरणाऱ्या मोलकरणीची सगळी कृत्ये रेकॉर्ड झाली. त्यानुसार, गाला यांनी याची तक्रार मालाड पोलिसांकडे केली, तसेच कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगदेखील दाखवले. तेव्हा मोलकरणीविरुद्ध तक्रार दाखल करत, मालाड पोलिसांनी तिला अटक केली. (प्रतिनिधी)
कॅमेऱ्याद्वारे पकडली चोरी!
By admin | Published: February 08, 2017 5:23 AM