मुंबई : थर्टीफर्स्टच्या रात्री नवीन वर्ष सुखाचे जाओ, असे साकडे घालण्यासाठी मुंबईकरांनी विविध मंदिरांत गर्दी केली. मात्र, मालाडमध्ये एका मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील दागिने लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मालाडच्या सुंदरनगर परिसरात असलेल्या अंबा माता मंदिरात हा प्रकार घडला. ३१ डिसेंबर रोजी सकाळी या सुंदरनगर वेल्फेअर सोसायटीचा सुरक्षारक्षक या ठिकाणी राउंड मारून परतला, तेव्हा मंदिरातील दुर्गा देवी, गणपती आणि हनुमानाच्या मूर्तीवर असलेले दागिने गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. या दागिन्यांची किंमत सुमारे सात लाख रुपये आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. मंदिराशेजारील सोसायटीत पालकमंत्री विद्या ठाकूर यांनी भेट दिली होती, ज्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत कोणीतरी हे कृत्य केले असावे, असा संशय मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडीक यांनी व्यक्त केला. त्यानुसार, अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करत सुरक्षारक्षक, तसेच सोसायटीतील रहिवाशांचे जबाब नोंदविण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. गेल्या काही वर्षात प्रार्थनास्थळांच्या दानपेट्या लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री मंदिरात चोरी!
By admin | Published: January 03, 2017 6:10 AM