लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाफेमुळे नाक आणि घशातील संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. अंधेरी येथील संपूर्णत: कोविड रुग्णालय असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील तज्ज्ञांनी हा अभ्यास केला आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ५०० हून अधिक आरोग्य कर्मचारी या अभ्यासात सहभागी झाले होते. उपचार सुरू असताना या कर्मचाऱ्यांची दोन चमूंमध्ये विभागणी करून वाफेचे उपचार देण्यात आले. यात दिवसातून नियमितपणे तीन ते चार वेळा केवळ पाणी गरम करून ही वाफ तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पाच मिनिटांसाठी देण्यात आली. या अभ्यासावर आधारित इंडियन मेडिकल गॅझेटमध्ये वैद्यकीय अभ्यास प्रकल्प सादर करण्यात आला आहे.
अहवालानुसार, नाक व घशात होणारा संसर्ग रोखल्याचे, त्याची तीव्रता कमी होत असल्याचे दिसून आले. तसेच, मुख्यत: कोरोना विषाणू फुप्फुसांना नुकसान पोहोचवीत असल्याचेही निदर्शनास आले. मात्र सातत्याने वाफ घेतल्याने फुप्फुसांना होणारा धोकाही कमी होत असल्याचे समोर आले. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे मानद कन्सल्टंट डॉ. दिलीप पवार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या डॉ. स्मिता चव्हाण, साहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षलकुमार महाजन, डाटा संशोधक सीमांतीनी भल्ला आणि लेझर शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. रुसी भल्ला यांनी अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे.वाफ घेणे ही शास्त्रीय उपचार पद्धत नाही. मात्र, कोरोना काळात उपचार सुरू असताना साहाय्यक उपचार म्हणून तिचा अवलंब करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या चमूने बारकाईने निरीक्षणाअंती अहवाल सादर केला. वाफेमुळे केवळ कोरोनाच नव्हे तर अन्य संसर्गही कमी होण्यास मदत होते.- डॉ. बाळकृष्ण अडसूळ, अधिष्ठाता,सेव्हन हिल्स रुग्णालय