मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे सरकार असले तरी त्याचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलेल होते. दरम्यान, या विधानावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातातच आहे. मात्र कुठे जायचं हे या रिक्षात मागे बसलेले ठरवतात, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
आज झालेल्या महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली.
यावेळी राज्यात कोरोनाच्या टेस्ट पुरेशा प्रमाणात होत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेत कोरोना टेस्टिंगच्या बाततीत महाराष्ट्र देशात १९ व्ा क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोरोनाची दुसरी लाट आली नाही तर मुंबईतील कोरोना एका महिन्यात नियंत्रणात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पुण्याकडे लक्ष देत नाही. पिंपरी-चिंचवडला मदत करत नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.