कदम-रावते एकत्र, मग राणेंचा विषय कुठे उरतो? देवेंद्र फडणवीस
By अतुल कुलकर्णी | Published: October 31, 2017 02:51 AM2017-10-31T02:51:05+5:302017-10-31T02:52:26+5:30
नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही यावरून राजकीय वाद रंगलेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे दोघे माझ्यासोबत व्यवस्थितपणे एकत्र असतात, मग राणेंचा प्रश्न कुठे येतो, अशी गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकली आहे.
- राणेंच्या मंत्रिपदाबाबत उलटसुलट चर्चा
मुंबई : नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही यावरून राजकीय वाद रंगलेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे दोघे माझ्यासोबत व्यवस्थितपणे एकत्र असतात, मग राणेंचा प्रश्न कुठे येतो, अशी गुगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकली आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, येत्या ३ तारखेला राणे यांच्या संबंधीची एक केस न्यायालयात सुनावणीस येणार आहे. तेव्हा काय ते स्पष्ट होईलच. या पार्श्वभूमीवर शपथविधी ३ तारखेच्या आधी होत नाही हेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राणे मंत्री म्हणून सरकारमध्ये आले तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, अशी चर्चा काही सेना नेत्यांनी सुरू केली असली तरी शिवसेना अशा किरकोळ कारणामुळे सत्ता सोडणार नाही, असे सेनेच्या एका बड्या नेत्याने सांगितले.
राणे मंत्रिमंडळात आल्यानंतर एका बाजूला राणे, तर दुसरीकडे रामदास कदम, दिवाकर रावते हे
चित्र कसे असेल, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांंना विचारला असता ते म्हणाले, राणेंचा पक्ष आता एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान ठेवावाच लागेल. राहिला प्रश्न मंत्रिमंडळाचा. कदम आणि रावते मंत्रिमंडळात एकमेकांना चांगले सहकार्य करतात तसेच राणेही करतील, असे मुख्यमंत्रीे म्हणाले.
भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी मात्र रावते आणि कदम यांच्यात होणारे वाद आम्ही मंत्रिमंडळात नेहमीच पाहतो. रावते काही बोलले की कदम खोडून काढतात आणि कदम काही बोलले की रावते खोडून काढतात, हे नेहमीचेच चित्र. आम्हा भाजपाच्या मंत्र्यांना त्यांच्यात काही ‘सुसंवाद’ घडावेत यासाठी वेगळे काहीच करावे लागत नाही. आता राणे मंत्रिमंडळात आले तर काय चित्र असेल याची आम्हालाही उत्सुकता आहे, असेही ते मंत्री हसत हसत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि राणे मंत्रिमंडळात येणार असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असा संदेश दिल्याची चर्चा आहे. याबद्दल नार्वेकर यांना विचारले असता आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले. तर शिवसेनेच्या वतीने कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले नव्हते, असा खुलासा उद्धव ठाकरे
यांचे प्रसिद्धिप्रमुख हर्षल प्रधान
यांनी केला आहे.