विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे डिजिटायझेशनच्या दिशेने पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:04 AM2020-03-13T01:04:58+5:302020-03-13T01:05:20+5:30
संगणकीय प्रक्रियेला सुरुवात; घरबसल्या मिळणार फायदा
मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आता आॅनलाइन साक्षांकित करून मिळतील. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घाटन गुरुवारी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्यासह व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कमीतकमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात आॅनलाइन साक्षांकनाची सुविधा उपलब्ध होईल. हा निर्णय विद्यार्थीकेंद्रित असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
विद्यापीठाने कालसुसंगत अभ्यासक्रमांच्या निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे नमूद करीत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तर विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
अशी असेल साक्षांकनाची प्रक्रिया
आतापर्यंत वर्षाला सुमारे १० हजार विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे आॅनलाइन साक्षांकित करून दिली जातील. यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशीतून सुटका होईल. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ होईल. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत केली जाईल. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
पैशांसह वेळेची बचत
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी त्यांना परदेशी शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाइन साक्षांकित करून देण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात होत असून, विद्यापीठाने टाकलेले हे एक डिजिटल पाऊल आहे. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेमुळे वेळेची बचत तर होईलच; त्याचबरोबर कमीतकमी खर्चात विद्यार्थ्यांना घरबसल्या ही सुविधा उपलब्ध होईल. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ