Join us

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:07 AM

उच्च न्यायालय; राज्य सरकार, मुंबई महापालिकेला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्या लोकांवर आळा ...

उच्च न्यायालय; राज्य सरकार, मुंबई महापालिकेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्या लोकांवर आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले. तसेच अशा लोकांकडून अधिक दंडाची रक्कम वसूल करण्याची सूचनाही केली.

थुंकण्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्या. लोकांना संवेदनशील करा, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली. बॉम्बे पोलीस ऍक्टअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, प्रशासन गुन्हेगारांकडून केवळ २०० रुपये दंड आकारते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

सध्याच्या काळात २०० रुपयांना काय किंमत आहे? तुम्ही महसूल बुडवत आहात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची लोकांची सवय मोडली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.

कोरोनाच्या काळात लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करत आहेत. त्यांना आळा घालावा, यासाठी अमरीन वांद्रेवाला यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

प्रशासनाला मोठा दंड आकारण्याची मुभा आहे, तरीही ते किरकोळ रक्कम दंड म्हणून आकारत आहेत. १०० रुपयांहून १२०० रुपये इतकी दंडाची रक्कम वाढवण्यात आली. तरीही या महामारीच्या काळात प्रशासन केवळ २०० रुपये दंड आकारत आहे, असे न्यायालयाने म्हटले.

पोलीस व टॅक्सी संघटनांना सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याबाबत संवेदनशील करण्याचे निर्देश पालिका व सरकारला द्यावेत, या याचिकाकर्तीच्या मागणीवर उत्तर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने पालिका व सरकारला दिले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली आहे.