लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण आवर्जून व्यायामासाठी वेळ काढताना दिसताहेत. अनेक तरुण जीममध्ये जाऊन दीड ते दोन तास घाम गाळताना दिसत आहेत. स्टिरॉइड आणि फूड सप्लिमेंट घेऊन पिळदार शरीरयष्टीसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत; परंतु हे स्टिरॉइड घेणे जिवावरही बेतू शकते. हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. प्रसंगी मूत्रपिंड निकामीही होऊ शकते. त्यामुळे स्टिरॉइड घेऊ नका, अन्यथा जिवावर बेतेल असा इशाराच तज्ज्ञांनी दिला आहे.
स्टिरॉइड घेतल्यामुळे बॉडी स्टोन फॉर्मेशन, किडनी निकामी होणे, तसेच बीपी वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
बाहेरून मजबूत, आतून पोकळ
मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड घेण्यामुळे हाडे मजबूत होण्याऐवजी ठिसूळही होऊ शकतात. थोडक्यात बाहेरून मजबूत आणि आतून पोकळ अशी स्थिती बनू शकते, अशी माहिती मूत्रपिंड शल्यविशारद आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील यांनी दिली.
असा राखा फिटनेस
पिळदार शरीरयष्टी बनविण्याच्या मागे लागू नये. त्यापेक्षा उत्तम आणि पोषक आहार घ्यावा, तसेच योगा आणि सूर्यनमस्कारसह अनेक प्रकारचे व्यायाम करता येतील. रोज तासभर चालवून किंवा सायकल चालवूनही उत्तम फिटनेस राखता येईल. फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या असा आहार घेता येईल.
ओव्हरडोस झाल्यास काय होईल?
- पिळदार शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर किंवा स्टिरॉइडचे हेवी डोस घेतात; परंतु स्टिरॉइड घेतल्यास शरीरात तात्पुरती ऊर्जा तयार होते. - हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि संबंधित व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. - स्टिरॉइडच्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ बनतात, स्नायू ताठर बनून वजन कमी होते. भूकही मंदावते.
स्टिरॉइडची अवैधपणे ऑनलाइन विक्री
डॉक्टरांकडून अनेक आजारांमध्ये उपचारासांठीही स्टिरॉइडचा वापर होतो; परंतु तो संबंधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी असतो. मात्र, स्टिरॉइडचा वापर पोलिस भरतीदरम्यानही अनेक उमेदवार करतात. अज्ञानामुळे स्टिरॉइडचा गैरवापर होतो आणि स्टिरॉइडची ऑनलाइन विक्री होत असल्याचेही समोर आले आहे.
स्टिरॉइडचा अतिवापर तरुणांसाठी जिवावर बेतू शकतो. पिळदार शरीरयष्टीच्या नादात केलेल्या स्टिरॉइडच्या वापरामुळे शरीर विविध आजारांनी आतून पोखरत जाईल. हाडे ठिसूळ बनू शकतात, बीपी वाढेल, हृदय आणि किडन्यांवर ताण येईल. किडन्या निकामी होण्याचाही अधिक धोका असतो. - डॉ. मंगेश पाटील, मूत्रपिंड शल्यविशारद, कर्करोगतज्ज्ञ