Join us  

अजूनही देवनार धुमसतेय...

By admin | Published: February 01, 2016 2:43 AM

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी सकाळी लागलेली आग तब्बल ९६ तासांनंतरही नियंत्रणात येऊ शकलेली नाही.

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी सकाळी लागलेली आग तब्बल ९६ तासांनंतरही नियंत्रणात येऊ शकलेली नाही. रविवारी सायंकाळी पुन्हा ही आग आटोक्यात आणल्याचा दावा मुंबई महापालिकेने आहे. प्रत्यक्षात मात्र, चार दिवस उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. दुसरीकडे आगीच्या धुराचे लोट अद्यापही देवनारसह लगतच्या परिसरावर कायम आहेत. धुरातील वाढ काही अंशी घटलेली असली, तरीदेखील वातावरणातील प्रदूषणाने स्थानिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत.महापालिकेसह अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी पहिल्यांदा जेट कूल सोल्युशनचा वापर केला, परंतु अद्यापही आग धुमसतच आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये आणि विद्यार्थ्यांना धुराचा त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने येथील आपल्या ७४ शाळाही शुक्रवारी आणि शनिवारी बंद ठेवल्या. मात्र, सगळा देखावा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, चार दिवस उलटूनही आग नियंत्रणात येत नसल्याने, स्थानिकांचा प्रशासनावरील रोष वाढत आहे. या घटनेला स्थानिकांनी सर्वस्वी पालिकेलाच जबाबदार धरले आहे. महत्त्वाचे म्हणजे, डम्पिंगच्या मध्यभागी लागलेली आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पालिकेने म्हटले आहे. शिवाय शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी धुराचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच देवनारसह लगतच्या काही परिसरावरच धूर पसरल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे, पण गुरुवारसह शुक्रवारी आग विझवण्याबाबत पालिकेने बाळगलेल्या निष्काळजीपणावर स्थानिकांनी बोट ठेवले. देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आल्याने, डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविण्याशिवाय पालिकेकडे कोणातच पर्याय नसल्याने, ‘डम्पिंग हटाओ, विक्रोळी बचाओ’ असा आवाज आंदोलनकर्ते देत आहेत. (प्रतिनिधी)‘डम्पिंग हटाओ, विक्रोळी बचाओ’चे आंदोलक गणेश शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, देवनार असो नाहीतर मुलुंड, विक्रोळी डम्पिंग असो, आमचे एकच म्हणणे आहे, ते म्हणजे सगळ्या डम्पिंगची क्षमता संपली आहे. मुंबईचा कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी पर्यायी डम्पिंगचा शोध घेतला पाहिजे. प्रश्न केवळ आगीचा आणि दुर्गंधीचा नाही, तर लोकांच्या जीवन-मरणाचा आहे. परिणामी, पालिकेने आता या प्रश्नी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.१मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्षात हा त्रास कायमचा कमी व्हावा, म्हणून कोणीच प्रयत्न करत नाही, अशी खंत मुंबई पर्यावरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुभाष मराठे-निमगावकर यांनी व्यक्त केली आहे. २गेल्या चार दिवसांपासून आगीच्या धुरामुळे झालेल्या प्रदूषणाचा त्रास लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याचे मराठे यांनी सांगितले. परिणामी, हा त्रास कायमचा कमी करायचा असेल, तर डम्पिंग शहराबाहेर हटवण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.