मुंबई : थंडीचा गारठा आणि नवीन वर्षाची धूम साजरी करण्यासाठी राज्यातील पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. राज्यासह शहर-उपनगरातील रिसॉर्ट्स, हॉटेल्स ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. यंदा मुंबईकरांचा हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये किंवा इमारतीवरील गच्चीवर नवीन वर्ष साजरे करण्याचा बेत आहे. मात्र नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगप्रकरणानंतर थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर या घटनेचे सावट राहणार आहे. यंदा नववर्ष आणि वीकेण्ड असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुंबईबाहेर जात आहेत. तत्पूर्वी बहुतेकांनी हॉटेल, रिझॉर्ट आदी ठिकाणी बुकिंग करून ठेवले आहे. साहजिकच आता शेवटच्या क्षणी बुकिंगसाठी धडपडणा-या मंडळींच्या पदरी निराशा पडत आहे.नववर्षानिमित्त नेहमीपेक्षा जास्त दर आकारण्यात येत आहेत. मुंबई परिसरातील सर्वच बडी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये विशेष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. विद्युत रोशणाई करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. डी.जे.च्या तालावर पर्यटकांना बेधुंद होऊन नाचता येणार आहे. आॅर्केस्ट्रा, लहान मुलांच्या नाच-गाण्याचे विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तथर्टी फर्स्टनिमित्ताने मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून सज्ज झाला आहे. कमला मिल आग प्रकरणानंतर पोलिसांनी पब, गच्चीवरील रेस्टॉरंट, हॉटेल्सना टार्गेट केले आहे. त्या ठिकाणच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. २४ डिसेंबर ते २२ जानेवारीपर्यंत हवाई कंदील उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.केवळ थर्टी फर्स्ट म्हणून नव्हे, तर कायमच ग्राहकांच्या सुरक्षेवर भर देत असतो. आमच्या सदस्यांना याविषयी वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा कार्यरत असल्याचीही पडताळणी केली जाते. ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली, ते आमचे सदस्य नव्हते. परंतु, सावधानता बाळगून नुकतेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने आम्ही सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे.- संतोष शेट्टी, मुंबई अध्यक्ष, इंडियन हॉटेलअॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन
तरीही ‘थर्टी फर्स्ट’साठी मुंबईकर सज्ज, उत्साहावर कमला मिलचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:21 AM