मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचंही भाजपाने जाहीर केले. या यादीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह ३४ मंत्र्यांची नावे आहेत, ज्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपाच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नाही. त्यावरुन, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच, पहिल्या यादीत भाजपाचे निष्ठावंत नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर न केल्याने खंत व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्रातील भाजप सरकारविरोधात दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत आहेत. मुंबईतील धारावी इथं झालेल्या समाजवादी संमेलनात उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे नेते येणाऱ्या निवडणुकीसाठी ४०० पारची घोषणा देत आहेत. मात्र, तुम्ही ४०० पार कसे जाता, हेच मी बघतो," असं चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी दिलं. तसेच, भाजपाने कुठं नेऊन ठेवलाय देश माझा, असे म्हणत खोचक टोलाही लगावला. यावेळी, नितीन गडकरी यांचं नाव भाजपाच्या पहिल्या यादीत नसल्याने खंतही व्यक्त केली.
''भाजपाने १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मला घेणंदेणं नाही. पण, १९५ जणांच्या आलेल्या यादीत नरेंद्र मोदींचं नाव आहे, अमित शाह यांचं नाव आहे, अनेकांची नावं आहेत. मात्र, नरेंद्र मोदी, अमित शाह ही नावं आम्हाला माहिती नव्हती. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाची ओळख करुन दिली. शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून देखील प्रमोद महाजन यांचंच नाव दिलं जातं,'' असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
''महाजन आणि मुंडें यांच्यानंतर त्यांच्यासोबतीने जे आले ते नितीन गडकरी होते. सन १९९५ ते ९९ च्या युतीच्या सरकारमध्ये असताना, त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे विक्रमी वेळेत पूर्ण केला. एक चांगलं काम करणारा माणूस, भाजपाचा आणि संघाचा निष्ठावान कार्यकर्ता. तरीही नितीन गडकरींचं नाव भाजपाच्या पहिल्या यादीत नाही,'' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींबद्दल खंत व्यक्त केली. तसेच, मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
कृपाशंकर सिंहाना दिलं तिकीट - ठाकरे
आता, काहीजण म्हणतील की अजून महाराष्ट्राची पहिली यादीच जाहीर झाली नाही. पण, मुंबईत राहणारा माणूस, ज्याच्यावर भाजपानेच बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप केला होता. त्या कृपाशंकरसिंहांचं नाव पहिल्या यादी आहे. पण, निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, ही कुठली गॅरंटी आहे, कुठला प्रकार आहे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय हा देश माझा... असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर प्रहार केला.