...तरीही झिकाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:00 AM2018-12-15T06:00:20+5:302018-12-15T06:01:57+5:30
राज्यात वर्षभर व्हायरसची दहशत
- स्नेहा मोरे
मुंबई : राज्याच्या बाहेरून आलेल्या ‘झिका’ व्हायरसने राज्यात वर्षभर दहशत पसरविली. यानंतर पालिका प्रशासनासह सार्वजनिक आरोग्य विभागही झिकाच्या प्रतिबंधासाठी सज्ज झाला. परिणामी, गेल्या १० महिन्यांत झिका व्हायरसचे १ हजार ४६३ नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविले. यात राज्यातील ४९८ नमुन्यांचा समावेश होता, मात्र इतके नमुने तपासूनही झिकाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती राज्य साथरोग नियंत्रण शाखेने दिली आहे.
बाहेरून राज्यात पसरलेल्या झिका व्हायरसने सामान्यांच्या मनात भीती निर्माण केली होती. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या काळात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत १ हजार ४६३ नमुने तपासले आहेत. तर यात राज्यातून एकूण ४९८ झिका व्हायरसचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात सर्वाधिक नमुने वर्धा जिल्ह्यातून पाठविण्यात आले होते. मुंबईतून केवळ चार नमुने पाठवले होते.
माहिती अधिकारांतर्गत या संस्थेत झिका व्हायरसचे वर्धा येथून ४६२ नमुने, पुण्यातून ३२ नमुने आणि मुंबईतून चार नमुने पाठवले आहेत. डेंग्यू, चिकूनगुनिया याच प्रकारचा ‘झिका’ हा एक विषाणू आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे झिका विषाणू पसरतो. आफ्रिका आणि आशिया खंडातील तब्बल २१ देशांमध्ये हा विषाणू धोकादायक बनला आहे. बाहेरच्या देशात प्रवास करणाऱ्यांना त्याची बाधा जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळले होते.
देशातही काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसचे अहमदाबादमधील बापूनगर परिसरात तीन रुग्ण आढळून आले आहेत. याची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सर्व रुग्णालयांना याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संशोधनासाठी नमुन्यांचा वापर
राज्यातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची यापूर्वी चाचणी करण्यात आली आहे. राज्यातील कुठल्याही नमुन्यात दोष आढळून आलेला नाही. याखेरीज आता या नमुन्यांचा वापर संशोधनासाठी करण्यात येणार आहे. या माध्यमातून झिका व्हायरसविषयी वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने संशोधन पातळीवर अभ्यास करण्यात येणार आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, सह संचालक, राज्य साथरोग नियंत्रण शाखा
झिकामुळे धोका
शरीरात या आजाराचे प्रमाण वाढले तर पायाची ताकद हळूहळू कमी होते. झिका विषाणू असलेला डास गर्भवती महिलेला चावल्यास जन्माला येणाºया मुलाचा मेंदू विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो. विशेष म्हणजे या रोगाची लक्षणे लवकर स्पष्ट दिसत नाहीत आणि याच्यावर कोणतीही ठरावीक औषधे आणि लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित रक्ततपासणी करावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काय आहे झिका?
झिका व्हायरस एडिस या डासाद्वारे पसरतो. युगांडातील झिका या जंगलाचे नाव याला देण्यात आले. युगांडात बंदरांवर १९४७ मध्ये हे डास प्रथम आढळले होते. १९५२ मध्ये माणसांमध्ये हा व्हायरस आढळला.
यात ताप येतो, डोळे लाल होतात आणि सांधेदुखी, डोकेदुखी तसेच लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे २ ते ७ दिवस राहतात. हा आजार माणसाकडून माणसाला किंवा प्राण्यांकडून माणसाला होऊ शकतो. गर्भवती आईकडून गर्भातील बाळाकडेही हा आजार संक्रमित होऊ शकतो.