Join us  

...तरीही खड्डे उरलेच!

By admin | Published: June 23, 2014 1:48 AM

मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची डेडलाइन संपल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी येथील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची डेडलाइन संपल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी येथील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप येथील खड्डे जैसे थे असल्याचे चित्र आहे.महापालिकेव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खाते, म्हाडा, टाटा, रिलायन्स आणि एमटीएनएल अशा उर्वरित प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. २५ मे रोजी संकेतस्थळावरील नोंदीनुसार, खड्ड्यांची संख्या ६६५ एवढी होती. त्यानंतरही ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह अन्य कामांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कायमच असून, संकेतस्थळावरील रविवारच्या नोंदीनुसार खड्ड्यांची संख्या २२३ आहे. त्यातील ४८ खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेने केला.दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची नादुरुस्ती असो वा रस्त्यावर पडलेले खड्डे असोत; अशा प्रकरणांत अनेकदा महापालिकेवरच टीका केली जाते. आणि रस्त्यांची निकृष्ट कामे करणारे कंत्राटदार नामानिराळे राहतात. म्हणून ज्या कंत्राटदारांना रस्त्यांची कामे दिलेली आहेत त्यांनाच त्या त्या रस्त्याचे परीक्षण करावे लागणार असल्याचा निर्णयही पालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. शिवाय या वर्षी शहर विभागातील सिमेंट काँक्रीटच्या २४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. ३८ ते ४० किलोमीटर लांंबीच्या डांबरी रस्त्यांचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)