...तरीही देशाच्या लोकशाहीवर विश्वास कायम
By Admin | Published: April 10, 2016 01:58 AM2016-04-10T01:58:12+5:302016-04-10T01:58:12+5:30
चौदा वर्षांतील माझा तुरुंगातील प्रवास खडतर होता. प्रत्येक क्षण अंगावर शहारा आणतो, नुसते ते दिवस आठवले की, डोळ््यांत पाणी येते, तरीही देशातील लोकशाहीवर अजूनही विश्वास आहे
मुंबई : चौदा वर्षांतील माझा तुरुंगातील प्रवास खडतर होता. प्रत्येक क्षण अंगावर शहारा आणतो, नुसते ते दिवस आठवले की, डोळ््यांत पाणी येते, तरीही देशातील लोकशाहीवर अजूनही विश्वास आहे, अशी भावना १४ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या आणि निर्दोष मुक्त झालेल्या मोहम्मद आमीर खान याने व्यक्त केली.
प्रेस क्लब येथे शनिवारी ‘फ्रेमड् अॅज अ टेररिस्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. दिल्लीतून १९९८ साली पोलिसांनी उचलून नेलेल्या मोहम्मद आमीर खान याने तुरुंगातील भयावह परिस्थितीविषयी आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या त्याच्या परिणामांविषयी या पुस्तकात लिखाण केले आहे.
१९ वर्षांचा असताना दिल्ली पोलिसांनी रस्त्यावरून उचलून नेले. औषध घेण्यासाठी घरातून बाहेर पडलो असताना, दहशतवादी हल्ल्यांतील २१ वेगवेगळ््या खटल्यांप्रकरणी आरोपी केले. घरी पुन्हा येईन, म्हणून वाट पाहणाऱ्या आई-वडिलांना १४ वर्षे भेटता आले नाही. १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा कळले की, २००१ साली वडिलांचे निधन झाले. तर आई ब्रेनडेड स्थितीत होती. ही सगळी परिस्थिती भयावह होती, कुठून सुरुवात करावी? हेसुद्धा कळत नव्हते, पण आता मी हळूहळू सावरतो आहे, असे मोहम्मद आमीर खान याने सांगितले. डॉ. राम पुनियानी यांनी आमीरच्या हिमतीला दाद देत, त्याच्या लेखनाचे कौतुक केले. राजकारण्यांनी केवळ भावनात्मक मुद्द्यांवर चर्चा करून सामान्यांची दिशाभूल करू नये. पोलीस अकादमीसारख्या संस्थांमध्ये हे पुस्तक वाचण्यास देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
१४ वर्षांनंतरही आमीरवर तुरुंगातील वातावरणाचा प्रभाव पडला नाही, हे विशेष उल्लेखनीय. आमीरने लिहिलेले पुस्तक तळागाळातील घटकांमध्ये पोहोचविण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की, पुस्तकातील लिखाण सहज-सोप्या पद्धतीने केले आहे. मात्र, पुस्तक वाचणे सहजसोपी गोष्ट नाही. या पुस्तकाने अनेकांची झोप उडेल, पुस्तकामुळे अस्वस्थता वाढेल हे निश्चित आहे. आजही सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक दोषी आहेत, तरीही खुर्चीवर बसून ते देशाचे सारथ्य करत आहेत, हे दुख:द आहे. देशात अंडरट्रायल्स असणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे. त्यात मुस्लीम, दलित तरुणांचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)
१४ वर्षांच्या तुरुंगवासात वाट्याला आलेली संकटे, त्रास, दु:ख यातून मी अजूनही सावरलो नाही. शारिरीकदृष्ट्या काही बदल घडले असतील माझ्यात, पण मनात ते सगळे साठले आहे. मानसिक धक्क्यातून सावरलो नसल्याने, मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार गेली काही वर्षे सुरू आहे.
- मोहम्मद आमीर खान