"तरीही यांची मस्ती गेली नाही; संजय राऊतांचा खरंच इलाज केला पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:55 PM2024-03-12T12:55:43+5:302024-03-12T12:57:24+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपावाले कचऱ्याच्या डंपरमध्ये बसल्याचं म्हटलं होतं.
मुंबई - लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर तुकोबांच्या अभंगाचा संदर्भा देत बोचरी टीका केली होती. तर, आमच्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा डंपर पलटी केल्यांचही म्हटलं होतं. त्यानंतर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही जशात तसे उत्तर देत फडणवीसांवर बोचरी टीका केली. आता, संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दात पलटवार केला आहे. तसेच, संजय राऊतांची अजूनही मस्ती न गेल्याचं त्यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपावाले कचऱ्याच्या डंपरमध्ये बसल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, आता गिरीश महाजन यांनी संजय राऊतांचं डोकं ठिकाण्यावर आहे का, असा सवाल करत त्यांची मस्ती अजूनही जिरली नसल्याचं म्हटलं आहे.
''संजय राऊतांबद्दल काय बोलायचं मी. तुमच्या बाजुला कुणीही राहिलेलं नाही. तुमच्याकडे ५० पंचावन्न पैकी ५ जण देखील राहणार नाही. तरीही तुम्ही मस्ती जात नाही, तुमची रग अजून जात नाही'', असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. ''आपल्या काय चुका झाल्या, यावर आपण परिक्षण, निरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि इकडे गेले, तिकडे, उकिरड्यावरची घाण गेली. मला वाटतं आता त्यांच्याकडे कुणीच राहिलं नाही. त्यामुळे, बिचाऱ्यांचा तोलच गेलेला आहे. त्यांचा बॅलेन्स गेलेला आहे, म्हणून सकाळपासून वेडवाकडं बोलायचं, घाणेरडं बोलायचं. एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे,'' असेही महाजन यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात कोपऱ्यात जाऊन फोनवर संभाषण केलं. त्यावरुनही संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यासंदर्भानेही, महाजन यांनी राऊतांवर बोचरी टीका केली. एखादा महत्वाचा फोन आला तर स्पीकर लाऊन बोलायचं का?, त्या राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?, या माणसाचा खरंच इलाज केला पाहिजे, त्यांच्या डोक्याचा इलाजच केला पाहिजे, असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले. तसेच, तुम्हाला जर उद्धव ठाकरेंचा फोन आला तर तुम्ही माईक लावून बोलणार आहात का, असा सवालही मंत्री महोदयांनी विचारला.
काय म्हणाले होते संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीसछाप सरकारने केला. पण, काही फायदा झाला नाही, ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये ते बसले आहेत. जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे. या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही, तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत, हे मी फडणवीस यांना सांगू इच्छितो अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.