काम अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता आठवडा पूर्ण व्हायला आला. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात येणार असलेला ब्रिज कोर्स अद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या दिवसांत विद्यार्थ्यांची उजळणी नेमकी कशी करून घ्यायची, याच संभ्रमात मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत. दरम्यान, ब्रिज कोर्सचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या ८ ते १० दिवसांत दुसरीपासूनच्या विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
पुढील वर्गात प्रवेश करताना आणि नवीन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल, असे टेमकर यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादेमुळे निर्माण झालेली शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक इयत्तेचा विषयनिहाय असणारा हा ब्रिज कोर्स ४५ दिवसांचा असणार असून १ ऑगस्टपासून शिक्षक हे विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकवायला घेऊ शकतील. यामध्ये गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असेल. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
* जुनी पुस्तके ठेवायची की परत करायची ?
शिक्षण विभागाकडूनच विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळांमध्ये जमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. जर पुढील दीड महिना ब्रिज कोर्समार्फत उजळणी होणार असेल तर जुनी पुस्तके शाळांमध्ये द्यायची का, असा संभ्रम पालक, विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र, ब्रिज कोर्समार्फत घेतल्या जाणाऱ्या उजळणीसाठी पुस्तकांची गरज असेलच असे नाही. शिक्षक विविध संकल्पना आणि शिकवण्यांमधून विद्यार्थ्यांची उजळणी घेऊ शकणार असल्याचे टेमकर यांनी स्पष्ट केले.
..............................