Join us

अवैज्ञानिक संकल्पनांना मिळणारी उत्तेजना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 2:53 AM

मार्च फॉर सायन्स मोर्चाचे आयोजन : मूलभूत संशोधनासाठी निधीची आवश्यकता

मुंबई : उच्च शिक्षणात मूलभूत संशोधनाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, अवैज्ञानिक संकल्पनांना उत्तेजन न देता समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील वैज्ञानिक संस्थांमध्ये काम करणारे वैज्ञानिक, संशोधक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे लोक आणि विज्ञानाविषयी आवड जपणारे विद्यार्थी रस्त्यांवर उतरले होते. ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ या मोर्चाचे आयोजन शुक्रवारी केले होते. रुपारेल कॉलेज ते शिवाजी पार्क या दरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला.देशात सामूहिक मारहाण, ऑनर किलिंगसारख्या घटना घडत असताना, त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी विज्ञानच मदत करणार आहे, पण याच विज्ञानाची गळचेपी सुरू आहे. या विरोधात वैज्ञानिकांनी एकत्रित येऊन दाद मागणे आवश्यक आहे, अशी भूमिका देशभरातील वैज्ञानिकांच्या मोर्चामध्ये समाविष्ट समूहाने केली आहे. विज्ञान संस्थांमध्ये निधी कपातीला स्थगिती देऊन एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के तरतूद ही विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी केली गेली.सध्या विज्ञानाला महत्त्व न देता, अवैज्ञानिक गोष्टीचा पुरस्कार होतो आहे. अवैज्ञानिक गोष्टी विविध माध्यमांतून जनतेला सांगण्यात आल्या, तर काही काळाने लोकांनाही ते सत्य वाटायला लागेल. स्वातंत्र्यापासून आपल्याकडे विज्ञानाच्या पुरस्काराला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, सद्य:स्थिती नेमकी उलट आहे. तेव्हा हे रोखण्यासाठी सर्व विज्ञानप्रेमींनी पुढाकार घ्यायला हवा.-रोहिणी करंदीकर, वैज्ञानिक,होमी भाभा सेंटर, टीआयएफआर.

टॅग्स :विज्ञान