मुंबईमध्ये टेरेस बनले ‘गर्ल्स हॉस्टेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:55 AM2017-07-28T01:55:10+5:302017-07-28T01:55:14+5:30
गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असतानाच एलटी मार्गच्या जमुना इमारतीची माहिती हाती लागली. १९१९ सालची ही जीर्ण इमारत. घराच्या शोधात याच इमारतीच्या प्रवेशद्वारावरचा केअर टेकर चौथ्या मजल्यावरील प्रशस्त हॉस्टेलची माहिती देतो
मनिषा म्हात्रे
मुंबई : गर्ल्स हॉस्टेलचा शोध सुरू असतानाच एलटी मार्गच्या जमुना इमारतीची माहिती हाती लागली. १९१९ सालची ही जीर्ण इमारत. घराच्या शोधात याच इमारतीच्या प्रवेशद्वारावरचा केअर टेकर चौथ्या मजल्यावरील प्रशस्त हॉस्टेलची माहिती देतो. या इमारतीत रहिवासी, तळ मजल्यावरील व्यावसायिक गाळे, कारखान्यांचा गोतावळाही तितकाच मोठा. त्यातून वाट काढत चौथा मजला गाठला. मात्र, हॉस्टेल खरेच इथे असावे, यावर क्षणभर विश्वास बसला नाही. बंद दरवाजातून डोकावून हॉस्टेलची विचारपूस केली. तेव्हा गुप्त दरवाजा खोलून सुरक्षा रक्षकाने आत घेतले. तेव्हा समोर वास्तव वेगळेचे होते. कारण बाहेरून बंद घर वाटणारे ते आतमधून हॉस्टेल होते. सुरुवातीलाच नोंदी करणारा टेबल. पुढे तिन्हीही बाजूला चिंचोळ्या खोल्या. एखाद्या प्रशस्त ठिकाणी आल्याचा भास होतो. ८ बाय ८ च्या खोलीत एक बेड, टीव्हीची व्यवस्था, पीओपीचे सिलिंग तर बाहेर शेअरिंगमध्ये फ्रीज. दाटीवाटीने बनविलेल्या खोल्यांमध्येही मुली १३ ते १५ हजार रुपये देऊन राहताना दिसल्या. याबाबत अधिक विचारणा केली असता, ‘पहेचान और पैसा हो तो सब चलता है’ असे शब्द तेथील केअर टेकरकडून कानी पडतात.
इमारतीत प्रवेश करतानाच केअर टेकरसोबत संवाद
प्रतिनिधी : काका इथे राहण्यासाठी भाड्याने जागा मिळेल का?
केअर टेकर (अशोक गवळी) : हो! चौथ्या मजल्यावर मुलींचे गर्ल्स हॉस्टेल आहे. तिथे चौकशी करा.
प्रतिनिधी : मुलींसाठीच आहे का? किती वर्षे जुने आहे?
गवळी : पाच वर्षांपासून इथे हॉस्टेल सुरू आहे. मी इथला केअर टेकर आहे. मालक साहील वझीफदार यांची ही मालमत्ता आहे. इथे काम नाही झाले तर या भागात अशी अनेक हॉस्टेल्स आहेत तेथे काम करून देतो, काळजी नका करू.
गवळींकडून माहिती घेत इमारतीच्या
चौथ्या मजल्यावर प्रवेश
(बंद दरवाजातून आत डोकावून विचारपूस)
प्रतिनिधी : काका इथे गर्ल्स हॉस्टेल आहे, असे समजले.
सुरक्षा रक्षक : हो आहे. १७ ते १८ खोल्या आहेत; पण सध्या एकही उपलब्ध नाही; पण एक मुलगी रूम खाली करणार आहे. साहेबच तुम्हाला त्याबाबत जास्त माहिती देऊ शकतील.
प्रतिनिधी : भाडे किती आहे?
सुरक्षा रक्षक : छोट्या रूमचे साडेबारा हजार, मोठ्या रुमचे साडेतेरा हजार रुपये. वीज बिल वेगळे.
प्रतिनिधी : एवढे भाडे.
सुरक्षा रक्षक : मॅडम परिसर तसा आहे. इतर ठिकाणी जास्त रक्कम आकारली जाते. इथे जवळच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली, तसेच नोकरी करणाºया मुलीच येतात.
प्रतिनिधी : साहेब केव्हा येणार?
दुसरा सुरक्षा रक्षक : सकाळी या, भेटतील ते. तोपर्यंत खोली बघून घ्या. आवडली तर साहेबांशी बोलून घ्या.
प्रतिनिधी : ठीक आहे. (खोली बघून प्रतिनिधी खाली परतली.)
केअर टेकर अशोक गवळींसोबत
निघताना संवाद
प्रतिनिधी : सर धन्यवाद. हॉस्टेल खूपच छान आहे; पण हे अधिकृत आहे का?
गवळी : मॅडम, साहेब मोठा माणूस आहे. एवढे सांभाळायला हिम्मत लागते. त्याचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यांना कोणीच काही करू शकत नाही. पहेचान और पैसा हो तो सब चलता है, एवढे आहे म्हणजे अधिकृतच केले असणार ना. आपल्याला काय करायचे. काम करुन घरी जायचे.
प्रतिनिधी : ठीक आहे; पण वीज बिल वेगळे का घेतात?
गवळी : तीन रूमचा एक वीज मीटर आहे. त्यामुळे तो तिघांमध्ये विभागला जातो. तर इतर सुविधाही उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त कपड्यांची बॅग घेऊन राहायला यायचे. वीज बिल तुमच्या वापरण्यावर आहे. महिना पाचशे ते हजार रुपये येते फक्त.
प्रतिनिधी : या मुलींची नोंद केली जाते का?
गवळी : हो. इथे भाड्याने राहायला. येणाºया मुलींची नोंद एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात केली जाते. तसेच दोन सुरक्षा रक्षक कायम पाहारा देत असतात.
फोनवरून - मालक
सोहेल वझीफदार
प्रतिनिधी : सर, तुमच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये रुम भाड्याने मिळेल का?
मालक : कहासे बात कर रहे हो? और कहा काम करते हो?
प्रतिनिधी : भांडुपमध्ये भाड्याने राहते. सीएसटीला एका वकिलाकडे नोकरी लागलीय. त्यामुळे जवळपास भाड्याने घर शोधत आहे. तुमच्या हॉस्टेलमध्ये दोन वेळा आली होती. मात्र, तुमची भेट झाली नाही.
मालक - ओके. अभी फिलहाल तो रुम खाली नही है. तीन महिने के बाद मिलेगी.
प्रतिनिधी : भाडे कमी होईल का? १३ हजार जरा जास्तच आहे.
मालक : तीन महिने बाद आओ. थोडा कम हो जायेगा. अभी फिलहाल कोई रुम खाली नही.
पोलीस म्हणे, हा तर प्रामाणिक व्यवसाय.
१९१९ सालच्या असलेल्या जमुना इमारतीत हॉस्टेल उभे राहिलेल्या ठिकाणी टेरेस होते. अनेकदा या अवैध हॉस्टेलबाबत पालिका, पोलीस यांच्याकडे येथील रहिवासी असलेल्या संतोष छबीलदास यांनी तक्रारी केल्या आहेत. २०१५मध्ये संतोष यांनी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावर २३ जुलै २०१५ रोजी त्यांना पोलिसांकडून तपासाअंती दिलेले उत्तरही तितकेच धक्कादायक होते. त्यांनी दिलेल्या उत्तरात इमारतीतील रहिवासी, भाडेकरुंची तसेच जागामालक यांची पोलीस पथकाने गुप्तपणे माहिती घेतली. त्यामध्ये येथील रुम काही विद्यार्थ्यांना भाड्याने दिले असल्याचे निदर्शनास आले. तर जागामालक हे स्वत: सुशिक्षित व समाजातील व्यक्ती असून प्रामाणिकपणे स्वत:चा व्यवसाय करत असल्याची माहिती एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे शिवाजी गवारे यांनी चौकशी पत्राच्या उत्तरात दिली होती. अवैध बांधकामाच्या तक्रारीसाठी त्यांना पालिकेत तक्रार करण्याचा सल्ला दिला. तर पालिकेकडे केलेल्या तक्रारीत पालिकेच्या एका माहिती अधिकारात तपासणीत काहीही गैर आढळले नसल्याचे नमूद केले आहे. तर २०१७ मध्ये केलेल्या माहिती अधिकारात या हॉस्टेलबाबत आपल्याही काहीही नोंद नसल्याचे सांगितले आहे.