Sting Operation: 'त्यांनी २०० रुपये दिले म्हणून आलो... उमेदवार वगैरे माहीत नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:08 PM2019-04-08T17:08:13+5:302019-04-08T17:09:09+5:30
मनोज कोटक यांच्या मिरवणुकीत दिसलेल्या 'शक्ती'पैकी थोडीफार शक्ती ही धनशक्ती वापरून आणल्याचं 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं आहे.
>> मनीषा म्हात्रे
ईशान्य मुंबईतीलभाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज वाजतगाजत, शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. परंतु, त्यांच्या मिरवणुकीत दिसलेल्या 'शक्ती'पैकी थोडीफार शक्ती ही धनशक्ती वापरून आणल्याचं 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं आहे. महिला आणि वृद्धांना २०० रुपये आणि तरुणांना ४०० रुपये देऊन ही गर्दी वाढवण्याचा प्रयत्न झाला. उमेदवार कोण आहे, आपण इथे कुणाच्या प्रचारासाठी आलोय, याचीही अनेक महिलांना कल्पना नसल्याचं 'स्टिंग'मध्ये दिसून आलं.
खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट भाजपाने कापलं आणि उमेदवारीची माळ मनोज कोटक यांच्या गळ्यात घातली. त्यानंतर, मनोज कोटक यांनी जोरात प्रचार सुरू केला आहे. आज उमेदवारी अर्ज भरतानाही त्यांनी जंगी मिरवणूक काढली. त्यात सहभागी झालेल्या काही महिलांशी आणि तरुणांशी आम्ही संवाद साधला. तेव्हा, धक्कादायक माहिती उघडकीस आली.
निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा होणारा गैरवापर, हा कायमच चर्चेचा मुद्दा राहिलाय. गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन माणसं आणल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर करताना दिसतात. ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. याच पार्श्वभूमीवर, मनोज कोटक यांच्या मिरवणुकीसाठी आलेल्या काही महिलांना २०० रुपये दिल्याचं समोर आलंय. अर्थात, उमेदवार कोण, पैसे कुणी दिले, हे या महिलांना माहीत नाही. फक्त २०० रुपये मिळाले म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून त्या मुलुंडला येऊन थांबल्या होत्या.
काही तरुण मुलं ठाणे, नवी मुंबईतून - म्हणजेच मतदारसंघाच्या बाहेरून आली होती. आपल्याला ४०० रुपये देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
पाहा 'लोकमत'ने केलेलं स्टिंग ऑपरेशनः