शेअर टॅक्सी चालकांचे आंदोलन

By admin | Published: June 23, 2016 03:48 AM2016-06-23T03:48:02+5:302016-06-23T03:48:02+5:30

वरळी नाका ते लोअर परेल आणि करी रोड स्टेशन दरम्यान धावणाऱ्या शेअर टॅक्सी चालकांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन पुकारले.

Stock Taxi Driver's Movement | शेअर टॅक्सी चालकांचे आंदोलन

शेअर टॅक्सी चालकांचे आंदोलन

Next

मुंबई : वरळी नाका ते लोअर परेल आणि करी रोड स्टेशन दरम्यान धावणाऱ्या शेअर टॅक्सी चालकांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन पुकारले.
वरळी नाक्यावरुन यु-टर्न घेताना वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देत चालकांना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या. मात्र सूचवण्यात आलेला मार्ग हा फारच लांब पडणार असल्याने त्याला विरोध करत शेअर टॅक्सी चालकांकडून बंद पुकारण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि शेअर टॅक्सी संघटनांत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पोलीसांनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार अन्य मार्गाने जाण्याची सूचना मान्य करण्यात आली.
वरळी नाका ते लोअर परेल ब्रीज आणि करी रोड स्थानकापर्यंत जवळपास ५0 ते ६0 शेअर टॅक्सी धावतात. मोठ्या प्रमाणात असलेला रहिवासी परिसर आणि कार्यालये पाहता शेअर टॅक्सीचा प्रवास हा योग्य वाटतो. गर्दीच्या वेळेत पंधरा मिनिटांत तर कमी गर्दीच्या वेळेत अवघ्या पाच ते सात मिनिटांत शेअर टॅक्सीतून प्रवास होतो. मात्र बुधवारी शेअर टॅक्सी चालकांनी टॅक्सी चालवण्यास नकार दिला आणि वरळी नाका ते स्थानकापर्यंतचा प्रवाशांचा प्रवास थांबला. त्यामुळे अनेकांना पायपीट करण्याशिवाय किंवा अन्य टॅक्सीचा पर्याय घ्यावा लागला. या मार्गावरील सर्व टॅक्सी चालकांनी वाहतूक पोलिसांनी आखून दिलेल्या सूचनेनुसार टॅक्सी चालवण्यास नकार दिला. मात्र वाहतूक पोलीस आणि वरळी-लोअर परेल शेअर टॅक्सी चालक-मालक संघटनेत झालेल्या बैठकीनंतर काही सूचना मान्य करण्यात आल्या.
वरळी नाक्यावरील शेअर टॅक्सींकडून त्याच ठिकाणाहून यु-टर्न करुन पुन्हा त्याच मार्गाने स्टेशनपर्यंत प्रवास केला जातो. मात्र गर्दीच्या वेळेत यु-टर्न केला जात असल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच यु-टर्न करुन पुन्हा त्याच मार्गावरुन टॅक्सी जात असल्याने स्थानिकांना चालणेही कठीण होऊन बसते. याविरोधात स्थानिक वाहतूक पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेअर टॅक्सींना यु-टर्न देण्यास नकार देण्यात आला. सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत वरळी नाक्यावरुन डावीकडून वळत मांजरेकर लेन आणि गणपतराव मार्गे लोअर परेल तसेच करी रोड स्थानकापर्यंत जाण्याचे वाहतूक पोलिसांनी सूचवले. मात्र त्याला शेअर टॅक्सी चालकांनी विरोध केला. यासंदर्भात वाहतूक पोलिसांसोबत बैठक घेण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यासंदर्भात युनियनचे सरचिटणीस राजू कदम यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी आणि स्थानिकांना होणारा त्रास पाहता वरळी नाक्यावरुन यु-टर्न देण्यास वाहतूक पोलिसांनी नकार दिला आणि गर्दीच्या वेळेत अन्य मार्ग सूचवला. मात्र हा मार्ग फारच लांबचा ठरत आहे. सध्याचा मार्ग हा एक किलोमीटरचा तर नविन मार्ग दोन किलोमीटरचा होईल. त्यामुळे यापूर्वी गर्दीच्या वेळेत पंधरा मिनिटांत होणारा प्रवास अर्धा तासांत होईल आणि त्याचा मनस्ताप हा प्रवाशांना आणि आम्हालाही होईल. तरीही आम्ही मागण्या मान्य केल्या आहेत. गुरुवारपासून शेअर टॅक्सी व्यवस्थित धावतील. (प्रतिनिधी)

Web Title: Stock Taxi Driver's Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.