मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी ३५ किलो हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला. महसूल गुप्तचर महासंचालयाने दिलेल्या हवाई गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. या अमली पदार्थांची किंमत सुमारे २४७ कोटी रुपये आहे.विमानतळावर आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.
या प्रकरणी झिम्बाब्वेच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यात एक ४६ वर्षीय महिला आणि २७ वर्षीय पुरुष प्रवाशाचा समावेश आहे. दोघांनाही हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले आहे. दोन्ही परदेशी नागरिक झिम्बाब्वेतील हरारे येथून निघाले होते. आदिस अबाबा येथे अमली पदार्थांचा साठा घेतल्यानंतर ते मुंबईत पोहोचले होते.
विमानतळावर यापूर्वीही अनेकदा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर अनेक मार्गांनीही देशात छुप्या मार्गाने अमली पदार्थ आणले जातात आणि देशभरातील विविध शहरांमध्ये ते छुप्या पद्धतीने विकले जातात.