चार कोटींचा सिगारेटचा साठा चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:54+5:302020-12-15T04:24:54+5:30
उरण : न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या कस्टडीत असलेला चार कोटी किमतीच्या सिगारेटचा साठा सहा दिवसांपूर्वी चोरीस गेला आहे. उरण-सोनारी ...
उरण : न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या कस्टडीत असलेला चार कोटी किमतीच्या सिगारेटचा साठा सहा दिवसांपूर्वी चोरीस गेला आहे. उरण-सोनारी येथील जेएनपीटीच्या स्पीडी सीएसएफमध्ये हा कंटेनर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका संशयित एजंटला अटक करण्यात आली आहे. चोरी प्रकरणी अधिक तपास न्हावा-शेवा बंदर पोलीस करीत आहेत.
जेएनपीटी बंदर सध्या आंतरराष्ट्रीय माफियांचा अड्डा बनले आहे. सोने, रक्तचंदन, अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. डीआरए, सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागांकडून विविध प्रकारच्या तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर जप्त केले जातात. उरण परिसरातील कोणत्याही कंटेनर यार्डमध्ये तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर येथील जेएनपीटीच्या सीएफएमध्ये आणले जातात. काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात. अशा चोरट्या मालाची आयात-निर्यात करताना तस्करीत सहभागी असलेल्या कंपन्या आपले बिंग फुटले जाऊ नये यासाठी बनावट कंपन्यांंच्या नावाचाही वापर करतात. तस्करीचा माल पकडला तर अशा बनावट कंपन्या माल ताब्यात घेण्यासाठी पुढे येत नाहीत. मग अशा आयात-निर्यातीच्या बेनामी तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले कंटेनर बेवारस म्हणून घोषित केले जातात.
न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेटचा स्टॉक असलेला सिगारेटचा साठा जप्त केला होता. या सिगारेटच्या साठ्याची किंमत चार कोटींच्या घरात आहे. खरे तर जप्त करण्यात आलेल्या सिगारेटच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याची तयारी सीमा शुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. मात्र ८ डिसेंबर रोजी सिगारेटचा साठा कंटेनरमधून चोरीला गेला आहे. यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील एका संशयित एजंटला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी दिली.