Join us

डोंबिवलीत बनावट सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशला मागणी वाढली असताना, अन्न व औषध प्रशासनाने डोंबिवलीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि हॅण्डवॉशला मागणी वाढली असताना, अन्न व औषध प्रशासनाने डोंबिवलीतील दोन दुकानांवर छापा मारून ६ लाख ८० हजारांचा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे. हा साठा गुजरातमधील सुरतहून आणल्याचे चौकशीत उघड झाल्याने, तेथेही स्थानिक पथकाने केलेल्या कारवाईत हॅण्ड सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा १३ लाखांचा साठा जप्त केला आहे.

डोंबिवलीत काही विक्रेत्यांकडे बनावट हॅण्ड सॅनिटायझर विक्रीस आहे. त्यावर संशयास्पद उत्पादन परवाना क्रमांक असून, उत्पादकचे नाव व पत्ता नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता-गुप्तवार्ता विभागाला मिळाली. त्याची पडताळणी करून २ डिसेंबरला गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय व ठाणे परिमंडळ ६ व ७ च्या औषध निरीक्षकांनी पूर्वेतील सारस्वत कॉलनीतील शुगर सेंटर व राजेंद्र प्रसाद रोडवरील आर.आर. इस्टेट एजन्सी येथे छापा मारून, त्यांच्याकडे विक्रीस ठेवलेला आरुष हॅण्ड सॅनिटायझरचा सहा लाख ८० हजारांचा साठा जप्त केला. संबंधित दुकानदारांनी खरेदी बिल व इतर पुरावे सादर केले नाहीत. चौकशीदरम्यान त्यांनी हा साठा सुरत येथील मे. जे.पी. पेंट ॲण्ड केमिकल यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, उत्पादन परवाना क्रमांक गुजरात येथील अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाने दिला नसल्याचे चौकशीत आढळले. हा साठा बनावट व विनापरवाना उत्पादन केला असल्याचा संशय बळावल्याने, या उत्पादनाची माहिती तातडीने गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनास कळविण्यात आली.

परवाना प्रत, इतर प्रमाणपत्रही बनावट

सुरत येथील अन्न व औषध नियंत्रण पथकाने ३ डिसेंबरला मे. जे.पी. पेंट ॲण्ड केमिकल्स येथे छापा टाकून विनापरवाना उत्पादित हॅण्ड सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा १३ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईवेळी संबंधित उत्पादकाकडे उपलब्ध परवाना प्रत व इतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे.