नवी मुंबई : ताजे अन्न कुत्र्याला, तर शिळे अन्न आपल्याला देत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी डोंगरभागात शोधमोहीम करून मारेकऱ्याला अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. त्याच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शरयुप्रसाद मिश्रा (५२) असे मयत व्यक्तीचे नाव असून, ते बोनसरी गावचे राहणारे आहेत. परिसरातील एका कॉरीवर ते सुरक्षारक्षकाचे काम करायचे. लगतच्या डोंगरभागात राहणाºया धनकुमार राय (३६) याने गुरुवारी सकाळी धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. राय हा डोंगरभागात एकटाच राहणारा असून, दररोज सकाळ-संध्याकाळ अन्नाच्या शोधात लोकवस्तीमध्ये यायचा. या दरम्यान मिश्रा हेसुद्धा त्याला स्वत:कडील जेवण द्यायचे. याकरिता ते नेहमी जेवणाच्या डब्यात रायला देण्यासाठी जादा चपाती घेऊन जायचे, त्यानुसार नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारासही राय हा मिश्रा काम करत असलेल्या ठिकाणी आला होता. या वेळी मिश्रा हे ताजे अन्न कुत्र्याला देत असून आपल्याला शिळे अन्न देत असल्याचा राय याला संशय आला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले असता, राय याने स्वत:कडील धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून पळ काढला. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी मिश्रा यांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी चौकशीमध्ये नागरिकांनी राय याच्याविषयी माहिती देऊन डोंगरावर अज्ञात ठिकाणी तो राहत असल्याची माहिती दिली. यानुसार त्याच्या शोधाकरिता वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक संतोष जाधव, नितीन बडगुजर, हवालदार दिगंबर झांजे, दत्तात्रेय भोरे, पोलीस नाईक सागर रसाळ, सोमनाथ वने, अनिल मानकर आदीचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी बोनसरी गावालगतच्या डोंगर भागात सुमारे दोन तास शोधमोहीम राबवली.
शिळे अन्न दिल्याच्या संशयाने हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:26 AM