चोरीला गेलेली सायकल २४ तासांत शोधली
आराेपीला अटक : डी. एन. नगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारा वर्षांच्या मुलीची सायकल चोरीला गेली हाेती. डी. एन. नगर पोलिसांनी ती चोवीस तासांत शोधून आरोपीलाही गजाआड केले. तिने स्वत: लिहिलेली एक कविता व प्रशस्तीपत्र भेट देऊन पोलिसांचे आभार मानले.
अदिती दीपक सावंत या मुलीची सायकल अंधेरी परिसरातून चोरीस गेली हाेती. तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या पथकाने ती शोधली. याप्रकरणी आरोपी इसरार ऊर्फ आड्या याला अटक करण्यात आली.
* मुलीने मानले पाेलिसांचे आभार
सायकल मिळाल्याचे समजताच मुलीने पाेलीस ठाण्यात धाव घेतली. हरवलेली सायकल मिळाल्याने तिला आनंदाश्रू अनावर झाले. तिने पोलिसांचे आभार मानले. त्यानंतर २६ जानेवारी रोजी पालकांसह पोलिसांची भेट घेतली. त्यांना स्वतः लिहिलेली कविता व एक प्रशस्तीपत्र भेट दिल्याचे पोलिसांनी सांगितले.