परदेशी नागरिकांचा डाटा चोरून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:31 AM2018-06-22T02:31:32+5:302018-06-22T02:31:32+5:30
महाराष्ट्रासोबत काश्मीर, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांमधील पर्यटनस्थळांवरील दुकानदारांकडील कार्ड स्वाइप मशिनच्या आधारे परदेशी नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणा-या टोळीचा गुन्हे शाखेने पदार्फाश केला आहे.
मुंबई : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांचा डेबिट, क्रेडिट कार्डचा डाटा चोरून त्याआधारे बनावट कार्ड तयार करून महाराष्ट्रासोबत काश्मीर, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांमधील पर्यटनस्थळांवरील दुकानदारांकडील कार्ड स्वाइप मशिनच्या आधारे परदेशी नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणा-या टोळीचा गुन्हे शाखेने पदार्फाश केला आहे.
या टोळीने गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने ४० कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जुबेर सय्यद, हसन शेख, फहीम कुरेशी, अबूबकर आणि महोम्मद हुसेन पाल अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मालमत्ता कक्षाचे अधिकारी दोन महिने आरोपींच्या मागावर होते. अटक आरोपी हे मुंबई, दिल्ली, झारखंड, बंगलोर येथील रहिवासी आहेत. यातील जुबेर हा यामागील मास्टरमाइंड आहे. त्यांनी बँकाचे विविध कॉल सेंटर येथील कर्मचाºयांना, तसेच हॅकर यांना हाताशी धरून परदेशी नागरिकांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डाटा विकत घेत असत. त्यांना दोन भारतीय नागरिक तो विकत होते. ते कोण आहेत? हा डाटा कुठून व कसा मिळवत होते? याचा शोध सुरू आहे. यामध्ये या टोळीने अमेरिका, चीन आणि मध्य पूर्वेतील नागरिकांना टार्गेट केले होते.
परदेशी नागरिकांच्या डेबिट- क्रेडिट कार्डावरील तपशीलासह त्यांचा पिन क्रमांकही टोळीच्या हाती लागत होता. मात्र, तो कसा याचे गूढ अद्याप कायम आहे. त्यामुळे यामागे काही परदेशी बँकांमधील अधिकाºयांचाही समावेश आहे का? या दिशेने गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.डाटा हाती लागल्यानंतर ते बनावट कार्ड तयार करत असत.