सागर नेवरेकर मुंबई : वयाच्या सतराव्या वर्षी तुमचे आयुष्य कसे असेल? तुमच्यापैकी बहुतेक जण उच्च माध्यमिक शिक्षण घेत असाल, आई-वडिलांसोबत राहत असाल, नवीन गोष्टी शिकत असाल, भविष्याचे नियोजन करीत असाल. मात्र, १७ वर्षांची नवीनीदेवी चौहान हिचे आयुष्य आपल्यासारखे नाही. मुंबईतील एका जुन्या झोपडपट्टीत ५० चौरस फुटांच्या झोपडीत ती आपल्या सात जणांच्या कुटुंबासह राहते. शाळा शिकत मोबाइल रिपेरिंग करून कुटुंबाचे पोट भरत आहे.नवीनीदेवीची आई रोजंदारीवर मजुरीचे काम करते. राहुल आणि रोहित हे धाकटे भाऊ. ती लहान असतानाच तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. नवीनीला दोन सावत्र भाऊ आहेत. तिचे घर डम्पिंग ग्राउंडजवळ असून पाणीपुरवठा किंवा शौचालयासारख्या मूलभूत सुविधाही तिच्या घरात नाहीत. दररोज ती पहाट होण्यापूर्वीच उठते. सार्वजनिक स्वच्छतागृहापुढील रांगेत उभी राहते आणि मग घरातील कामे उरकते. जवळच्या नातेवाइकांनी आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिला अभ्यास करण्यापासून कायम परावृत्तच केले. तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मात्र ठाम राहिला आहे. ती परिस्थितीवर मात करून आजही शाळेत जाते.सलाम बॉम्बे फाउंडेशनचे काम आर. पी. मार्ग महापालिका माध्यमिक शाळेत सुरू झाले, तेव्हा नवीनीदेवीने लगेच मोबाइल दुरुस्ती कोर्स करण्याची संधी घेतली. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेचच चार मोबाइल फोन दुरुस्त करून तिने दोन हजार रुपये कमविले. ज्या मुलीला अभ्यास करू नको असे सांगितले जात होते ती आता तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे.यासंदर्भात नवीनी म्हणाली की, आता दहावीला असल्यामुळे काही दिवस मोबाइल रिपेरिंग बंद केले आहे. मोबाइल रिपेरिंग करण्यासाठी घरामधून पूर्ण सहकार्य मिळते. मुलांना कोणत्याही क्षेत्रातले चांगले शिक्षण मिळत असेल, तर त्यांनी त्वरित शिक्षण घेतले पाहिजे. आता प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहे. मुलींना प्रोत्साहन आणि सहकार्य केल्यास मुली पुढे मोठ्या संख्येने पुढे येतील. काहींच्या घरामध्ये दोन किंवा तीन भावंडे असतील तर भावंडांपैकी मुलीला सोयी-सुविधांपासून वंचित ठेवून सर्व गोष्टी मुलाला पुरविल्या जातात. त्यामुळे समाजातील मुलींप्रतिचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.आईला कामावर न पाठवता तिला घरामध्ये ठेवायचे आहे. एवढेच नाहीतर, तिने तिच्या धाकट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. ती घराजवळ राहणाºया आणि शाळेत जाणे परवडत नाही अशा मुलांच्या शिकवण्याही घेते. आपला भविष्यकाळ अंधाराने भरलेला आणि काहीच आशा नसलेला आहे, असे काही महिन्यांपूर्वी नवीनीला वाटत होते. मात्र सलाम बॉम्बे फाउंडेशनचा मोफत मोबाइल दुरुस्तीचा कोर्स केल्यापासून चित्र बदलले. आपल्यासाठीही आयुष्यात खूप काही आहे, असे तिला आता वाटत आहे.>गणित विषयाची प्राध्यापक व्हायचं आहेनवीनीला गणित विषयाची प्राध्यापक होण्याची आणि मोबाइल दुरुस्तीचे दुकान उघडण्याची इच्छा आहे. येत्या दोन वर्षांत एकटीने घर चालवता येईल एवढे पैसे कमवायचे, असे तिचे स्वप्न आहे. आईला कामावर न पाठवता तिला घरामध्ये ठेवायचे आहे. धाकट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे.(नवीनीदेवी चौहान, विद्यार्थिनी, मोबाइल रिपेरिंग)
‘ती’ सतराव्या वर्षी भरतेय कुटुंबाचे पोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:03 AM