लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड (पूर्व) येथील नवजाला पाडा येथील घरांवर गेल्या महिन्याभरापासून रात्रीबेरात्री घरांच्या छपरावर दगड, विटा आणि बाटल्या फेकण्याचे प्रकार अद्यापही सुरू असून याबाबत आरोपींना पकडण्यात दिंडोशी पोलिसांना अपयश आल्याने या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या दगडफेकीच्या प्रकारांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली असून दिंंडोशी पोलिसांनी आतापर्यंत चार गुन्हे दाखल केले आहेत. मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात येत आहे. १३ मे रोजी नागरिकांनी या परिसरात पाळत ठेवली असता एक तरुण मध्यरात्री दोन वाजता विटेचे तुकडे फेकताना आढळला. नागरिकांनी त्याला पकडून विचारणा केली असता आपले नाव प्रेम परेश शाह असल्याचे त्याने सांगितले. मात्र तो लगेच पळून गेला. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केली असता पोलिसांनी भादंवि ३३६ अन्वये प्रेम परेश शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतरही २३ मे रोजी एक इसम अशाच हल्ल्यात जखमी झाला. त्यापाठोपाठ शनिवारीही समाजकंटकांकडून फेकण्यात आलेल्या बाटलीमुळे एक गर्भवती महिला जखमी झाली होती.सातत्याने असे प्रकार घडूनही स्थानिक पोलीस त्यावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. या जागेवर बिल्डरचा डोळा असल्याने गुंडांच्या मदतीने दहशत पसरवण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये अशाच प्रकारे या भागात दंगल करणारे श्रीकांत मिश्रा, मगन तिवारी शर्मा, रवी शर्मा, करण ईरायन यांच्यासह अनेक आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दंगलीत बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची तक्रार संजय शुक्ला यांनी केली होती. मात्र राजकीय वरदहस्तामुळे आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप मोहन कृष्णन यांनी केला आहे.
घरांवरील दगडफेकीमागील गूढ कायम
By admin | Published: June 16, 2017 2:40 AM