Join us

उद्यानांत पाषाण चित्रे; सेल्फीसाठी मुंबईकरांचीही लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 3:17 PM

BMC Park : उद्यानात पाषाणावर पांडा या प्राण्याचे चित्र चितारण्यात आले.

मुंबई : दहिसर परिसरातील तीन उद्यानांमधील दगडांवर विविध प्राण्यांची अत्यंत आकर्षक आणि बोलकी चित्रे काढण्यात येत आहेत. याअंतर्गत दहिसर पूर्व परिसरातील जरीमरी उद्यानात असणाऱ्या एका पाषाणावर 'पांडा' या प्राण्याचे चित्र चितारण्यात आले असून दहिसर पश्चिम परिसरातील ज़ेन उद्यानातील (Zen Garden) एका मोठ्या पाषाणावर हत्तीचे चित्र चितारण्यात आले आहे. महापालिकेच्या उद्यान खात्याने अभिनव पद्धतीने साकारलेल्या या पाषाण चित्रांचे परिसरातील नागरिक कौतुक करत असून पाषाण चित्रांसोबत सेल्फी काढण्यासाठी थोरामोठ्यांसह लहानग्यांचीही लगबगही दिसून येत आहे. या दोन उद्यानांव्यतिरिक्त दहिसर पूर्व परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे स्मृती उद्यानातील एका पाषाणावर हरीण चितारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सदैव सुसज्ज व कार्यतत्पर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे विविध पर्यावरण पूरक उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. त्याचबरोबर महापालिकेची उद्याने अधिकाधिक आकर्षक व सुसज्ज असावी, यासाठी महापालिकेचे उद्यान खाते सातत्याने अभिनव उपक्रमही राबवित असते. याअंतर्गत पर्यावरण विषयक प्रदर्शनांचे व कार्यशाळांचे आयोजन करणे, पर्यावरणाशी संबंधित विविध प्रारूपे (मॉडेल) उद्यानांमध्ये बसविणे, अशा बाबीही राबविण्यात येत असतात. याच शृंखलेत आता महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर चित्रे चितारण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेच्या उद्यान खात्याने हाती घेतला आहे. याअंतर्गत प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या आर उत्तर विभागातील म्हणजेच दहिसर परिसरातील तीन उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर प्राण्यांची आकर्षक व बोलकी चित्रे चितारण्यात येत आहेत. या पैकी दोन उद्यानांमध्ये चित्र काढण्याचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या उद्यानातही चित्र काढण्याचे काम पुढील काही दिवसात पूर्ण होईल. 

या तिन्ही उद्यानांमध्ये चितारण्यात येत असलेल्या पाषाण चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात येणारे रंग हे मुंबईच्या पावसातही टिकून राहतील, असे वापरण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही चित्रे चितारण्यासाठी येणारा खर्च हा विविध संस्थांच्या 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' निधीमधून करण्यात येत आहे, अशीही माहिती उद्यान अधीक्षक परदेशी यांनी दिली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापर्यावरणमुंबई