Join us

दिव्यात लोकलवर दगडफेक; महिला जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 8:39 PM

ठाणे: जलद लोकलवर केलेल्या दगडफेकीत शंकुतला बागुळे (49) या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दिव्यात घडली. त्यांच्या कपाळाला जखम झाली असून त्यांच्यावर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर घरी सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नेरळ येथे राहणाऱ्या बागुळे या कसारा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तेथून सीएसटी लोकलने ठाण्यात येताना, दुपारी दिवा स्थानकातील फलाट सोडल्यावर कोणीतरी दगड फेकला. हा दगड द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात बसलेल्या बागुळे यांच्या कपाळाला लागल्याने त्या जोरात ओरडल्या. डब्यात बसलेल्या महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या कल्याण अध्यक्षा अरूणा गोफणे आणि उल्हासनगर अध्यक्षा आशा मदणे यांनी बागुळे यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरवले. तसेच ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयामार्फत तेथील वन रुपी क्लिनीकमध्ये प्रथमोपचार नेत त्यांच्यावर उपचार केले. तसेच भिरकावलेला दगड त्या डब्यात सापडल्याची माहिती मदणे यांनी दिली.

बागुळे यांच्या कपाळावर जखम झाली असून त्यावर मलमपट्टी करून त्यांना घरी सोडल्याची माहिती क्लिनीकचे डॉ. राहुल घुले यांनी दिली.

टॅग्स :लोकलमध्य रेल्वे