- अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढण्यात आला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय वेळीच घेतला गेला नसता तर स्वादुपिंडावर परिणाम झाला असता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी ‘लोकमत’ला दिली. (The stone in Sharad Pawar's bile duct was removed with the help of endoscopy. Pratit Samdani informed Lokmat)शरद पवार यांना नेमका काय त्रास होता? पवारसाहेबांच्या पित्ताशयात खडे झाले आहेत. ज्याला गॉल स्टोन म्हणतात. मध्यंतरी पोटात दुखू लागले म्हणून ते उपचारासाठी आले होते. तपासणीअंती पित्ताशयात खडे आढळून आले. शिवाय, त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जात होते. ते औषध सुरू असताना ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते औषध थांबवून दोन-तीन दिवसांनी ऑपरेशन करू असे ठरले होते. मात्र, त्यातील एक खडा पित्तनलिकेत अडकल्यामुळे त्यांना वेदना वाढल्या. कॉमन बोईल डक्टमधील खडा काढणे गरजेचे होते. त्यामुळे एण्डोस्कोपी करावी लागली. हा आजार कोणाला होऊ शकतो? त्याची लक्षणे काय? साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर हा आजार होऊ शकतो. अमेरिका, युरोप या देशांमध्ये याचे प्रमाण पूर्वी जास्त होते. तिकडे ४० वर्षे वयाच्या २० ते ३० टक्के लोकांमध्ये हा आजार आढळतो. त्यातील एक ते दोन टक्के रुग्णच फक्त गंभीर होतात. मात्र, आता हा आजार आपल्याकडेही आढळतो. कमी वेळात खूप वजन कमी होणे, दोन जेवणाच्या वेळेमध्ये खूप अंतर असणे किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांना, गरोदर महिलांना हा आजार होऊ शकतो. हा आजार अनेकदा अनुवंशिक देखील असल्याचे आढळते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढले तरी पित्ताशयात खडे होऊ शकतात. जर पित्तनलिकेत खडे अडकले तर ताप येणे, उलटी होणे, उजव्या बाजूचे पोट दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे तातडीने उपचार करणे गरजेचे असते.आणखी शस्त्रक्रियेची गरज आहे का?त्यांचा तातडीचा त्रास आम्ही दुरुस्त केला आहे; परंतु पित्ताशयात खडे आहेत. चाचण्यांचे निष्कर्ष पाहून आठ ते पंधरा दिवसांत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जाईल.
शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढला, डॉ. प्रतीत समदानी यांनी ‘लोकमत’ला दिली माहिती
By अतुल कुलकर्णी | Published: April 01, 2021 8:15 AM