मुंबई : मंगळवारी जाहीर झालेला यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेच्या निकालात वडाळ्याच्या परमानंद दराडेला देशभरातून ४३९ वे स्थान तर नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणाऱ्या अश्विन घोलपकरनेही ७७३ वे स्थान मिळवले आहे. परमानंद दराडेने याआधीही २ वेळा यूपीएससी परीक्षा दिली आहे. मिळालेल्या यशाचा आई-वडिलांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि आॅगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. २०१७ मध्ये पहिली आणि २०१८ मध्ये दुसरी यूपीएससी परीक्षा परमानंदने दिली. त्या वेळी ६१५ वे स्थान मिळालेल्या परमानंदची भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसमध्ये निवड झाली. मात्र त्याने आणखी एक प्रयत्न करायचे ठरविले आणि या वेळी त्याला ४३९ वे स्थान मिळविण्यात यश मिळाले. आणखी एक प्रयत्न करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
परमानंदप्रमाणेच नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणाºया अश्विन घोलपकरनेही ७७३ वे स्थान यादीत निश्चित केले आहे. आयआयएममधून एमबीए पूर्ण केलेल्या आणि मार्केटिंगमध्ये नोकरी करणाºया अश्विनला या क्षेत्राची ओढ होतीच. त्यामुळे त्याने २०१५ साली कॉर्पोरेट नोकरी सोडून यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. कुटुंबाचाही पूर्ण पाठिंबा मिळाला. सध्या दिल्ली येथे असणाºया अश्विनने यशाचे श्रेय त्याच्या शिक्षकांनाही दिले. दिल्लीत त्याला परीक्षापूरक वातावरण मिळाल्याचे मत त्याने व्यक्त केले. अश्विनचाही हा तिसरा प्रयत्न आहे आणि मानांकनात सुधारणेसाठी तो अजून एक प्रयत्न करण्याचा विचार करीत आहे. मुंबईतही पूरक वातावरण हवे. परमानंद आणि अश्विन हे दोन्ही विद्यार्थी मुंबईतील लक्ष अॅकॅडमीचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रात यूपीएससीसाठी निवड होणाºया उमेदवारांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या ठिकाणीही स्पर्धा परीक्षांसाठी पूरक वातावरण, आवश्यक सोयी-सुविधा हव्या असल्याचे मत लक्ष अॅकॅडमीचे संचालक अजित पडवळ यांनी व्यक्त केले. शासनाकडे आम्ही याचा सतत पाठपुरावा करत असून शासनाने यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे.