लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवई परिसरातील मोरारजीनगर परिसरात गस्त घालत असताना, ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई अजय रामचंद्र बांदकर (४१) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जून रोजी पहाटेच्या सुमारास ते अन्य अधिकाऱ्यांसोबत वाहनातून गस्त घालत असताना, काही जण मोरारजीनगर परिसरात रस्त्याकडेला ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढला. त्यानंतर ते पुढे निघून गेले. थोड्या वेळाने पुन्हा त्याच मार्गाने मागे येताच, आरोपींनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानुसार पोलिसांनी वाहनांचा वेग वाढवला. यात ते थोडक्यात बचावले. पुढे, पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावून आरोपीचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही.
पुढे, एका घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये चौघे जण कैद झाले. त्यानुसार पोलिसांनी राहुल, इस्माईल, शैजाद, शिवकुमार ऊर्फ भैया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांचा शोध सुरू केला आहे.
........................................