नामदेव मोरे,नवी मुंबईतुर्भे नाक्यावर महापालिकेच्या क्षेपणभूमीला लागून असलेल्या जमिनीवर डांबर प्लांटबरोबर काँक्रीट निर्मितीचा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. शासकीय जागेचा दुरुपयोग करून बिनधास्त व्यवसाय सुरू असल्याची तक्रार करूनही जिल्हा अधिकारी, महापालिका व एमआयडीसी प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. यामुळे अधिकाऱ्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाने जयप्रकाश नारायण यांना सर्व्हे नंबर ३७६ व ३७७ ही जमीन दगडखाणीसाठी दिली आहे. मार्च १९९५ मध्ये त्यांनी परवान्याचे नूतनीकरण केले होते. यानंतर त्याच परवान्यावर जून २००२ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर त्या अर्जावर पुन्हा मार्च २००९ व नंतर मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक येथील दगडखाण बंद झाली आहे. येथील मूळ मालक जगताप यांनी लिंटेच कंपनीसोबत २०१० मध्ये भागीदारीमध्ये डांबर निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. परंतु यामध्ये मूळ मालकाचा हिस्सा फक्त एकच टक्का असून, लिंटेचचा ९९ टक्के आहे. येथील वीज, पाण्याचा वापर व व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवान्यांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. डांबर प्लांटविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. अनेकांनी संपर्क साधून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याची माहिती दिली. बांधकाम क्षेत्रामध्ये नामांकित असलेल्या जे कुमार कंपनीचा काँक्रीटचा प्रकल्पही याच जागेवर सुरू केलेला आहे. यालाही परवानगी नसल्याची तक्रार आदर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केली आहे. परंतु संबंधित कंपनीमधील अधिकाऱ्यांनी मनपा व इतरांना आमच्याकडे २०१६ पर्यंत परवानगी असल्याचे सांगितले आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयाने जयप्रकाश जगताप यांना सदर जागा २०१६ पर्यंत भाडेकरारावर दिली आहे. याविषयीचे करारपत्र त्यांच्या नावाने आहे. यानंतर जे कुमारचा काँक्रीट प्रकल्प व लिंटेचचा डांबर प्रकल्प येथे कसा सुरू झाला, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर भागीदारीमध्ये हा प्रकल्प सुरू असेल किंवा भाडेतत्त्वावर जागा घेतली असेल तर त्याविषयी जिल्हा अधिकारी, एमआयडीसी किंवा संबंधित कार्यालयाची परवानगी घेतली असल्याचे कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीत. वास्तविक एमआयडीसी प्रशासनाने सदर जागा आमच्या मालकीची असून, आमही ती औद्योगिक कारणासाठी येथील शेतकऱ्यांकडून संपादित केल्याचे स्पष्ट केले आहे. येथील सर्व्हे क्रमांक ३७६ व ३७७ कोणालाच वाटप केलेला नाही. यामुळे त्यांना पाणी व इतर सुविधा देण्याचा प्रश्न नसल्याचे सांगितले आहे. परंतु मालकीचा दावा करणाऱ्या एमआयडीसीने या ठिकाणी अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.> आशीर्वाद कोणाचा ? या ठिकाणी दोन मोठे उद्योग सुरू आहेतच, शिवाय छोटे छोटे इतर व्यवसायही सुरू आहेत. वास्तविक दगडखाण सुरू असताना संबंधितांनी पर्यावरण रक्षाणासाठी वृक्षलागवड करणे आवश्यक असते. परंतु येथे पर्यावरण रक्षणासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही. यामुळे या व्यवसायांना राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील कोणाचा आशीर्वाद आहे, कोण पाठीशी घालत आहे, याचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे. > परवानगी दिली कोणी ? तुर्भे नाक्याजवळी सर्व्हे क्रमांक ३७६ व ३७७ मध्ये जयप्रकाश जगताप यांना दगडखाणीसाठी जागा दिली असून, तसा भाडेकरार संबंधितांशी केला आहे. २०१६ मध्ये दगडखाणीला परवानगी आहे, परंतु प्रत्यक्षात दगडखाण बंद असून तिथे दुसरेच व्यवसाय सुरू आहेत. डांबर प्लांट व काँक्रेट प्रकल्पासाठी परवानगी दिली नसल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे. मग या व्यवसायांना नक्की परवानगी दिली कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दगडखाणीत काँक्रीटचाही प्रकल्प
By admin | Published: January 05, 2016 2:12 AM