पनवेल : नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपूलाशेजारी असलेल्या सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करुन प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच फुटली.सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास एका मोटरसायकलवर बसून तीन अज्ञात समाजकंटक आले, त्यातील दोघांनी चेहऱ्याला रुमाल बांधला होता व त्यांनी रस्त्यावरुन चर्चच्या दिशेने दोन ते तीन दगड फेकले. यात प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच त्यामुळे फुटली आहे. ही सर्व घटना चर्चच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून त्यावेळी तेथे असलेल्या पहारेकऱ्यांनी त्या अज्ञात इसमांच्या मागे जाण्याचा प्रयत्नसुध्दा केला परंतू तो निष्फळ ठरला. सदर चर्च हे २००७ साली बांधण्यात आले असून ८०० पेक्षा जास्त समाजबांधव एका वेळी प्रार्थनेसाठी उपस्थित असतात. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्यासह खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर दगडफेक
By admin | Published: March 22, 2015 12:33 AM