अमराठी भाषेतील पाट्यांवर दगडफेक
By Admin | Published: March 3, 2016 04:34 AM2016-03-03T04:34:34+5:302016-03-03T04:34:34+5:30
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा राजकारण सुरू केल्याचे कांदिवलीतील घटनेतून दिसून येत आहे. आता चारकोपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत असलेल्या दुकानांच्या
मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा राजकारण सुरू केल्याचे कांदिवलीतील घटनेतून दिसून येत आहे. आता चारकोपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत असलेल्या दुकानांच्या, तसेच खासगी शिकवणीच्या पाट्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना चारकोप पोलिसांनी अटक केली.
कांदिवलीच्या चारकोप परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर रोडवरील अपना बझार परिसरात ही तोडफोड करण्यात आली. या परिसरातील मराठीत पाट्या नसणाऱ्या दुकानाच्या पाट्यांची तोडफोड करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे, तसेच या पाट्यांवर मनसैनिकांनी दगडफेकही केल्याचे समजते. एका खासगी शिकवणीवर्गाचाही यामध्ये समावेश आहे. याची माहिती मिळताच, चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली व मनसेचे देवेंद्र खैर, विश्वास मोरे आणि रोहन कुलेकर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)