मातंग समाजावरील हल्ले थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:47 AM2018-05-17T01:47:58+5:302018-05-17T01:47:58+5:30
गेल्या महिन्याभरात मातंग समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत. या सर्व हल्ल्यांची मुख्यमंत्र्यांनी येत्या ८ दिवसांत सीबीआय चौकशी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मातंग समाजाने दिला आहे.
मुंबई : गेल्या महिन्याभरात मातंग समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत. या सर्व हल्ल्यांची मुख्यमंत्र्यांनी येत्या ८ दिवसांत सीबीआय चौकशी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मातंग समाजाने दिला आहे. समाजावरील भ्याड हल्ल्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मातंग समाजाने बुधवारी आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलनही केले.
या आंदोलनात मातंग समाजाचे नेतृत्व करणाऱ्या १०हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते. राज्यातील सातारा, अमरावती, चंद्रपूर, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी मातंग समाजातील लोकांवर हल्ले होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, काही प्रकरणांत हत्या झाल्या असतानाही त्या प्रकरणांना आत्महत्या आणि अपघातांचे स्वरूप दिल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
परिणामी, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली, तसेच ८ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे तपास सोपविला नाही, तर तालुकानिहाय मोर्चे काढून राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
महिन्याभरात मातंग समाजावर झालेले हल्ले!
जयेश खुडे आणि विलास वाकोडे या मातंग तरूणांचे मृतदेह पनवेल व ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत संशयास्पद स्थितीत आढळले.
अंकुश हदगीले यांना फाशी देऊन मारले असून या मृत्यूची नोंद कोणत्याही चौकशीविना आत्महत्या म्हणून करण्यात आली.
सिल्लोड येथील विठ्ठल वाघ यांच्या हत्येप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
लग्नविधीसाठी मंदिर प्रवेश करणाºया अशोक शिंदे या युवकाला कुटुंबासह मारहाण करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात अमरावती चव्हाण या महिलेला समाजकंटकांनी मारहाण केली.
बुलढाणा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवण्यास संविधानिक पद्धतीने विरोध केल्याबद्दल कैलास खंडारे व इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
बीडच्या गेवराई तालुक्यातील विशाल उमप, तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे विलास साबळे या तरूणांना शुल्लक कारणावरून जबर मारहाण करण्यात आली.