लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नियोजनाअभावी महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशावेळी राज्य सरकार आरोपबाजीत दंग आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार, सेवासुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे केंद्रावर आरोप करणे थांबवा आणि रुग्णांचे जीव वाचवा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
प्रत्येक रुग्णाला बेड, ऑक्सिजन आणि औषधे पुरविण्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. कोरोनाला रोखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. रुग्णांना सेवा पुरविणे राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांचे काम आहे. केवळ केंद्रावर आरोप करून चालणार नाही. उलटसुलट वक्तव्ये देणे थांबवा. राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा, रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आठवले यांनी केले.